चित्रपटांचा बहुभाषिक प्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी दररोज नव-नव्या तंत्राचा वापर केला जातो.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी दररोज नव-नव्या तंत्राचा वापर केला जातो. एकदा का ते तंत्र यशस्वी ठरले की मग त्याचा प्रभाव सगळीकडे दिसून येतो, याची प्रचीती पुन्हा एकवार येते आहे. खरंतर, या वेळी काहीशी उलट परिस्थिती पाहायला मिळते आहे. म्हणजे प्रसिद्धीचे हे नवे तंत्र दाक्षिणात्य चित्रपटांनी त्यांच्या सोईसाठी सुरू केले होते. करण जोहर नामक भन्नाट व्यावसायिक डोके असलेल्या निर्मात्याने याचा फायदा घेत ‘बाहुबली’ दाक्षिणात्य भाषांबरोबरच हिंदीतही आणला. या चित्रपटाने देशभरात कमाईचा जो इतिहास घडवला ते लक्षात आल्यानंतर आता हिंदी असो, दाक्षिणात्य असो वा मराठी चित्रपट असोत.. प्रत्येकालाच आपला चित्रपट ‘देशव्यापी’ असावा, असे वाटू लागले आहे. त्यामुळे आता आपले चित्रपट हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी अशा विविध भाषेत डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची अहमहमिकाच जणू निर्मात्यांमध्ये लागलेली दिसते.

ओटीटीमुळे जागतिक स्तरावरील आशयापासून प्रादेशिक चित्रपट वा वेबमालिका पाहण्याची सवय प्रेक्षकांना लागली आहे, हे सगळय़ांना ज्ञात झाले आहे. चित्रपट विविध भाषेत डब करून दाखवण्याची ही प्रथा नव्यानेच सुरू झाली आहे का? तर तसे नाही. याआधीही चित्रपट विविध भाषेत डब केले जातच होते, मात्र मुख्य प्रवाहातील चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटांनी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने देशभरात सगळीकडेच हिंदी चित्रपट पाहिले जातात. त्यांना देशात फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे हे गृहीतक प्रचलित होते. केवळ भारतीय बाजारपेठेतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आलेले हॉलीवूडपट इंग्रजीबरोबरच हिंदीत डब करून प्रदर्शित केले जात होते. शिवाय, दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत, कमल हसन यांच्यासारखे मुळात देशभरात लोकप्रिय असलेल्या कलाकारांचे चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड या तीन भाषांबरोबरच हिंदीतही प्रदर्शित केले जात होते. पण तोपर्यंत आपले चित्रपट ‘देशव्यापी’ (पॅन इंडिया) असावेत, असा फारसा आग्रह केला जात नव्हता.

हल्ली मात्र दक्षिणेपासून मराठीपर्यंत प्रत्येक कलाकार, निर्माता- दिग्दर्शकाच्या तोंडी देशव्यापी चित्रपटांची भाषा रुळू लागली आहे. यातले व्यावसायिक गणित ओळखून त्याची सुरुवात करण जोहरने ‘बाहुबली’पासून केली. प्रभास हा दाक्षिणात्य अभिनेता हिंदी ‘बाहुबली’मुळे देशभरात लोकप्रिय झाला. कमाईचे सगळे विक्रम या चित्रपटाने मोडले. त्यानंतर प्रभासला हिंदी चित्रपटांमधून संधी मिळाली. हाच प्रकार डिस्नेनेही आपल्या चित्रपटांच्या बाबतीत सुरू केला. डिस्नेचे इंग्रजी चित्रपट हिंदीतील लोकप्रिय कलाकाराच्या आवाजात डब होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू लागले. डिस्ने, माव्‍‌र्हलपटांबरोबरच अन्य मोठय़ा हॉलीवूड चित्रपटांनीही हिंदी आणि तमिळ, तेलुगू, कन्नड अशा आणखी तीन भाषांमध्ये चित्रपट डब करून दाखवायला सुरुवात केली. हळूहळू हा फंडा यशस्वी ठरू लागला तसा त्याचा आणखी विस्तार सध्या विविध स्वरूपांत पाहायला मिळतो आहे. मात्र हा फंडा खऱ्या अर्थाने करोनानंतर दोन वर्षांनी प्रदर्शित झालेल्या आणि देशभरात तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांनी अधिक रुजवला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यशाचे हे बहुभाषिक आणि देशव्यापी गणित या वेळी पहिल्यांदा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाने साध्य करून दाखवले. १७ डिसेंबर २०२१ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला. याशिवाय, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ज्या वेळी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येतील की नाही ही शंका होती, त्या वेळी या चित्रपटाच्या बहुभाषिक आवृत्तींनी देशभरातून ३६५ कोटींची कमाई केली. तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट म्हणून त्याला मान मिळालाच, मात्र हिंदीतही या चित्रपटाने दोन ते तीन आठवडय़ांत ६२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. इतका प्रतिसाद त्या वेळी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांनाही मिळाला नाही. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटगृहातून प्रेक्षकांची गर्दी खेचत होता.

अल्लू अर्जुनला हिंदीतील त्याच्या यशाबद्दल विचारणा झाली असता आपला चित्रपट हा फक्त दाक्षिणात्य नाही, तर तो देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल असा चित्रपट असल्याचे त्याने सांगितले. आणि तेव्हापासून दक्षिणेतील कलाकार आणि चित्रपटांनी देशव्यापी चित्रपटांची ही संकल्पना लावून धरली आहे. त्यापाठोपाठ आलेल्या ‘राधे श्याम’, ‘आरआरआर’, ‘के.जी.एफ.-२’ आणि ‘विक्रम’ हे दाक्षिणात्य चित्रपट हिंदीसह चार प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित झाले. त्यामुळे दाक्षिणात्य कलाकार हिंदीतही लोकप्रिय ठरू लागले. आणि काही हिंदी चित्रपटातील कलाकारांनीही दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला, एकमेकांच्या चित्रपटात भूमिका करण्यापासून आपले चित्रपट दाक्षिणात्य भाषेत डब करून देशभरातील मोठा प्रेक्षकवर्ग मिळवण्याची धडपड हिंदीतही मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित चित्रपटही चार भाषांमध्ये डब करून दाखवण्यात येणार आहे. त्यातही या चित्रपटाच्या दाक्षिणात्य आवृत्तींच्या प्रसिद्धीची धुरा दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. राजामौली हे चित्रपटाचे दक्षिणेतील प्रस्तुतकर्ते असल्याने तिथे चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. भरीस भर म्हणून चित्रपटाचा नायक शिवा म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या व्यक्तिरेखेला तेलुगूमध्ये अभिनेते चिरंजीवी यांचा आवाज देण्यात आला आहे. बहुभाषिक आणि देशव्यापी होण्यासाठी असे विविध पर्याय सध्या हिंदी चित्रपटात अजमावले जात आहेत.

मराठीतही पडसाद
मराठीतही लवकरच ‘हर हर महादेव’ हा अभिजीत देशपांडे दिग्दर्शित, झी स्टुडिओची निर्मिती असलेला ऐतिहासिक चित्रपट पाच प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाची घोषणा झाली असून हा चित्रपटही मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतीच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘डिअर मॉली’ या चित्रपटाची घोषणा केली असून हा चित्रपटही हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘हा चित्रपट तद्दन मसाला नसून अतिशय आशयपूर्ण आहे. सध्या प्रेक्षकांना आशयपूर्ण चित्रपट हवे आहेत. याचा विचार करून आम्ही हा चित्रपट मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करून सगळय़ा स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ओटीटीमुळे जागतिक प्रेक्षक विविध चित्रपट पाहतो. त्यामुळे तेथे असलेला प्रेक्षकही उद्या ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकेल,’ अशी माहिती ‘डिअर मॉली’ चित्रपटाचे निर्माते प्रवीण निस्छोल यांनी दिली. याशिवाय, ‘दुनियादारी’, ‘खारी बिस्कीट’सारख्या चित्रपटांचे निर्माते दीपक राणे यांचा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा मराठी- कन्नड अशा दोन भाषेत चित्रित झालेला चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘दाक्षिणात्य चित्रपटांनी त्यांच्या भाषिक सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी चित्रपटही आपल्या सीमा ओलांडू शकतो. नवनवीन विषय हाताळण्यात अग्रेसर असलेल्या मराठी चित्रपटांबद्दल एकूणच चित्रपटसृष्टीत कुतूहल आणि कौतुक आहे. त्यामुळे आपणही आपले चित्रपट वेगवेगळय़ा भाषेत प्रदर्शित केले तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील,’ असे मत दीपक राणे यांनी व्यक्त केले.

केवळ बहुभाषिक नव्हे..

चित्रपट देशभर पोहोचवण्यासाठी केवळ विविध भाषेत डब करणे पुरेसे नाही, तर कलाकारांची निवडही तशा पद्धतीने करावी लागते, असे चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. २०१८ साली आलेला ‘२.०’ तसेच २०१९ सालचा ‘साहो’मधून लोकप्रिय हिंदी-दाक्षिणात्य कलाकारांचे चेहेरे दिसले होते. ‘२.०’मधून रजनीकांत आणि अभिनेता अक्षयकुमार तर ‘साहो’मधून प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे चेहेरे दिसले. या वर्षीच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’मध्येही आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. आता ‘ब्रह्मास्त्र’मध्येही रणबीर कपूर, आलिया भट्टसह दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनची महत्त्वाची भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The multilingual journey of movies hindu cinema manufacturers amy

Next Story
धाडसी प्रयत्न
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी