मनोरंजन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. या मनोरंजनात नाटक, चित्रपट, मालिका, वेब मालिका आणि हल्लीच्या काळात रिअ‍ॅलिटी शोची भर पडली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधील सदस्यांची, त्यांच्यात होणाऱ्या वादांची, खेळांची जितकी चर्चा रंगते तितकीच चर्चा रंगते ती म्हणजे बिग बॉसच्या घराची. प्रत्येक पर्वात आपली मराठी संस्कृती जपणाऱ्या घराने या चौथ्या पर्वातही घराची सजावट करताना मराठमोळेपण, आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे. मात्र पहिल्यांदाच बिग बॉस मराठीचे पर्व चाळवजा सेट उभारलेल्या घरात रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवेळी ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांचे घर मराठमोळय़ा पद्धतीने सजवले जाते. घरात गेल्यावर तीन महिने तिथेच राहणाऱ्या घरातील प्रत्येक सदस्याला ते आपलंसं वाटावं यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले जातात. या पर्वातही प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींमध्ये हरवून जाईल, अशाप्रकारे हे घर सुशोभित करण्याचा प्रयत्न असल्याचे वाहिनीच्या वतीने सांगण्यात आले आणि म्हणूनच यंदा ‘बिग बॉस’च्या या पर्वात पहिल्यांदाच घरात प्रत्येक मराठी माणसांच्या मनात घर करून असलेली चाळ संस्कृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला जुनी चाळ आणि एका बाजूला आधुनिक चाळीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. चाळीतल्या घरांसमोरचा वऱ्हांडा, तिथे बसायला टेबल, खुच्र्याही ठेवल्या आहेत. भिंतींवर भोवरे, पतंग, कॅरमही लावण्यात आला आहे.

अंगणात सजले फेटे घातलेले मुखवटे

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यावर दारातच छान असे तुळशीचे वृंदावन आहे. एका बाजूला रिक्षा ठेवली आहे ज्यात सदस्य बसून आपल्या शाळा, कॉलेजच्या आठवणींत रममाण होऊ शकतील. दुसरी एक आकर्षक जागा या घरातील अंगणात आहे ती म्हणजे सकाळच्या चहासाठीचा कोपरा. शोभेचे काचेचे ग्लास ठेवून तिथे बसण्यासाठी जागाही करण्यात आली आहे. त्यानंतर स्विमिंग पूलजवळ माणसांच्या चेहऱ्यांचे मुखवटे लावत त्यांना वेगवेगळय़ा रंगांचे फेटे घालण्यात आले आहेत. घरात सगळय़ात जास्त जिथे भांडणं होतात त्या स्वयंपाकघरात मातीची भांडी, पाटा वरवंटा, खलबत्ता ठेवण्यात आला आहे. जिथे घरातील सदस्यांचे खरे चेहरे दिसतात आणि महेश मांजरेकर घरातल्या सदस्यांची शाळा घेतात त्या लिव्हिंग रुमचा रंग गुलाबी असून टीव्हीच्या मागे मुखवटे लावले आहेत.

वेगळं काही करायला गेलात तर फसाल..

या पर्वात घरात कोणते कलाकार असणार? घरात जास्त भांडणं होणार? की मैत्री जास्त फुलताना दिसणार? हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. मात्र घरात येताना जसे आहात तसेच या.. असा सल्ला या घराचे हेडमास्टर महेश मांजरेकर यांनी दिली आहे. दरवेळी नवनव्या कलाकारांना कधी सांभाळून घेणारे, कधी त्यांना खरमरीत शब्दांत सुनावणारे मांजरेकर याही पर्वात बिग बॉसच्या घराची सूत्रं सांभाळणार आहेत. ‘घरात येणाऱ्या नवीन सदस्यांनी कोणतीही खास तयारी करून येऊ नका, जसे आहात तसेच वागा. कारण काही वेगळं करायला गेलात तर फसाल. त्यामुळे थोडी सदसद्विवेकबुद्धी तेवढी घेऊन या’, असं आवाहन या नव्या सदस्यांना मांजरेकर यांनी केलं आहे. ‘बिग बॉस’चे घर म्हणजे वादविवादाचे घर असं जरी संबोधलं जात असलं तरी या घरात नवी नातीही जोडली जाताना दिसतात. १०० दिवस वेगवेगळय़ा विचारांच्या, मानसिकतेच्या आणि स्वभावाच्या माणसांसोबत घालवणे ही या सदस्यांसाठी खरंच मोठी कसोटी ठरते.

या नव्या पर्वात सगळं ‘ऑल इज वेल’ असेल असं वेगवेगळय़ा अवतारात प्रेक्षकांसमोर येऊन महेश मांजरेकर सांगताना दिसतात. या पर्वाच्या संकल्पनेबद्दल ‘कलर्स मराठी’चे कार्यक्रम प्रमुख विराज राजे म्हणतात, ‘‘या वेळी बिग बॉसच्या घरात वेगळेपण दिसणार आहे. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्येही वेगळेपण दिसणार आहे. ही संपूर्ण कलाकृती उभारण्यासाठी सगळय़ांनीच खुप मेहनत घेतली आहे, त्यामुळे या पर्वात नव्याने सदस्यांकडून काय अनुभवायला मिळणार हे पाहण्यासाठी आम्हीही उत्सूक आहोत.’’ रविवारी, २ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातल्या खेळांना, वादांना आणि महेश मांजरेकर मास्टरांच्या शनिवार आणि रविवारी भरणाऱ्या शाळेलाही सुरुवात होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new season bigg boss marathi entertainment drama web series reality show ysh
First published on: 02-10-2022 at 00:02 IST