The Odyssey Box Office Collection : हॉलीवूडच्या एका चित्रपटाने भारतातल्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून हा फॅन्टसी-ॲक्शन सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, तो सिनेमा म्हणजे ‘द ओडिसी’. हॉलीवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या सिनेमाला भारतामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने बॉलीवूडच्या सिनेमांना मागे टाकले आहे. अजय देवगणच्या ‘धमाल ४’ला मागे टाकून ‘द ओडिसी’ या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. पाच दिवसांमध्ये या सिनेमाने भारतामध्ये किती कमाई केली ती जाणून घेऊया.

हॉलीवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये नेहमीच मोठी उत्सुकता असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळतो आणि भारतातही त्यांच्या सिनेमांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. नोलन यांचा बहुचर्चित फॅन्टसी-ॲक्शनपट ‘द ओडिसी’ सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने बॉलीवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे. कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या ‘धमाल ४’लाही मागे सोडून या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. पाच दिवसांत ‘द ओडिसी’ने भारतात नेमकी किती कमाई केली जाणून घेऊया.

ख्रिस्तोफर नोलन यांनी भारतामध्ये येऊन केले ‘द ओडिसी’चे प्रमोशन

हॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. टॉम हॉलंड, अ‍ॅन हॅथवे आणि मॅट डॅमन अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाचे भारतामध्ये प्रमोशन करण्यात आले होते. याचा मुंबईमध्ये प्रीमियर शो पार पडला होता. यावेळी ख्रिस्तोफर नोलन, टॉम हॉलंड व डॅमन हे स्वतः प्रमोशनसाठी भारतामध्ये आले होते. त्यांच्या या सिनेमाने भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दररोज हा सिनेमा कोट्यवधी रुपये कमवत आहे.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘द ओडिसी’ला भारतीय प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी १७.४० कोटी रुपयांची ओपनिंग केली. त्यानंतर शनिवारी-रविवारी या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने २२.५० कोटी रुपयांची कमाई केली, तर रविवारी तिसऱ्या दिवशी २१.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘द ओडिसी’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सिनेमाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली, तरीही ‘द ओडिसी’ चित्रपटाने सोमवारी ८ कोटी रुपयांची कमाई करत घोडदौड सुरूच ठेवली आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ‘द ओडिसी’ने ८.३५ कोटी रुपयांची कमाई केली. यासह या चित्रपटाची भारतातील पाच दिवसांची एकूण नेट कमाई ७७.६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, त्यामुळे हा सिनेमा भारतामध्ये बॉलीवूडवर भारी पडत असून तो तुफान कमाई करीत आहे.

हॉलीवूडच्या सिनेमांची भारतामध्ये जोरदार कमाई

हॉलीवूडच्या सिनेमांना भारतीय प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ‘ऑब्सेशन’ या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. ‘ऑब्सेशन’ सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. यानंतर आता ‘द ओडिसी’ सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ऑब्सेशन’ सिनेमाने भारतामध्ये ८४.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. याचबरोबर ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ सिनेमाने ७५.२१ कोटी, ‘मायकेल’ सिनेमाने ७०.७६ कोटी रुपये आणि ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा २’ सिनेमाने ३०.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती, त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर हॉलीवूडच्या चित्रपटांचा दबदबा दिसून आला आहे.