सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘द राजा साब’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभासच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहायला येणारे प्रभासचे चाहते विचित्र कृती करताना दिसत आहेत. काही चाहते मगरींच्या प्रतिकृती घेऊन थिएटरमध्ये घेऊन थिएटरमध्ये चित्रपट बघायला जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, एका चाहत्याने थिएटरमध्ये कागदांना आग लावल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी, लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा व्हायरल होणारा व्हिडीओ ओडिशातील अशोका थिएटरमधला आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता स्क्रीनसमोर रंगीत कागदाचे तुकडे जाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कृत्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. चाहते आहात म्हणजे तुम्ही अशा गोष्टी कराव्या, असं नाही, असं म्हणत लोक नाराजी व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहून चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेबद्दलही नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत. चाहत्याच्या या कृतीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले, असं म्हणत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
एका युजरने लिहिलं, “प्रभासचे चाहते हे कसे वागत आहेत?” तर दुसऱ्याने म्हटलं, “तुम्ही अशा गोष्टी करायला नको होत्या. कृपया समजूतदार लोकांसारखे वागा. हे तुमचे घर नाही, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही लोक अशा प्रकारे वागून प्रभासचं नाव खराब करत आहात.”
पाहा व्हिडीओ-
मगरी घेऊन चित्रपट पाहायला आले
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास एका मोठ्या मगरीला पकडून अनेकांशी हाणामारी करताना दाखवण्यात आलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचे अनेक चाहते थेट प्लास्टिकच्या मगरी घेऊन थिएटरमध्ये पोहोचले. मगरी बनावट असल्या तरी त्या पाहून बरेच प्रेक्षक घाबरले होते.
‘द राजा साब’चे कलेक्शन
प्रभासचा ‘द राजा साब’ चित्रपटाचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘धुरंधर’ च्या वादळाला मागे टाकत त्याने जबरदस्त कमाई केली आहे. ‘द राजा साब’ ने पहिल्या दिवशी ५४.१५ कोटींची कमाई केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी ही सर्वात मोठी ओपनिंग आहे.
