चित्ररंग : आपापल्या अवकाशाची खुली कहाणी

‘द स्काय इज पिंक’ ही प्रत्यक्षातील निरेन आणि आदिती चौधरी या जोडप्याची शोकांतिका आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

चित्रपट : द स्काय इज पिंक

आपल्या सगळ्यात जिव्हाळ्याची गोष्ट कधी ना कधीतरी आपल्या हातून वाळूसारखी निसटून जाणार आहे, याची जाणीव झाली की हाताची मूठ अधिक घट्ट आवळून आहेत ते निसटते वाळूचे कण पकडण्याचा प्रयत्न सुरू होतो. एक गोष्ट धरून ठेवण्याच्या नादात बाकीच्या अशा अनेक गोष्टी कधी हातून निसटून जातात, कधी अर्धवट आपल्यापाशी राहतात. मात्र हे सगळे समजून घेत सतत सकारात्मकतेने पुढे जात राहणे ही गोष्ट सोपी नाही. त्यामुळेच असेल कदाचित, ज्यांना ते जमते त्यांची गोष्ट अधिक प्रेरणादायी वाटत राहते. शोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे. पण इथेही केवळ शोकांतिका न मांडता मरणाच्या दारात असलेल्या आपल्या मुलीला घट्ट ओढत तिला जितके मिळेल तितके आयुष्य देण्यासाठी धडपड करणाऱ्या जोडप्याचे आपापले अवकाश रंगवत त्यांची गोष्ट दिग्दर्शिकेने सांगितली आहे.

‘द स्काय इज पिंक’ ही प्रत्यक्षातील निरेन आणि आदिती चौधरी या जोडप्याची शोकांतिका आहे. सळसळते तारुण्य अनुभवत असताना दिल्लीच्या चांदनी चौकातला निरेन आणि श्रीमंत दक्षिण दिल्लीतील आदिती यांचे प्रेमात पडणे, प्रेम पुढे नेण्याआधीच विवाहबंधनात अडकणे आणि त्यानंतर लगेचच आलेले पालकत्व. भरभर झालेल्या या प्रवासात या दोघांची पहिली मुलगी तान्या जन्मत:च रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने पाचव्याच महिन्यात मरण पावते. त्यानंतर ईशान आणि मग आएशाचा जन्म होतो. आएशा जन्मत:च बहिणीला झालेला आजार घेऊन येते आणि या जोडप्याचा वेगळाच संघर्ष सुरू होतो. काही महिने ते काही वर्षांचे आयुष्य घेऊन आलेल्या आएशाला वाचवण्याच्या नादात आदिती आणि निरेन विभागले जातात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना मुलीच्या उपचारासाठी पैसे जमवण्यापासून ते तिच्या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पैसे कमावून स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात निरेन ईशानला सांभाळत दिल्लीत, तर आदिती आएशाच्या उपचारांसाठी लंडनमध्ये अशी विभागणी होते. आएशा १८ वर्षांची होईपर्यंतचा तिचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान निरेन-आदिती यांच्यात व्यक्तिगत होत गेलेले बदल आणि त्यानुसार बदलत गेलेले त्यांचे नाते यावर शोनाली यांनी जोर दिला आहे. चित्रपटात मृत्युपश्चात आएशाच्या तोंडून तिच्या आईवडिलांची गोष्ट ऐकायला-पाहायला मिळते. एकाअर्थी हे आएशाच्या नजरेतून टिपलेले जग आहे, कारण गोष्ट ती सांगते आहे. मात्र ही गोष्ट सांगताना त्याच्याकडे पाहण्याचा दिग्दर्शिकेचा एक वेगळा दृष्टिकोन आहे जो यात प्रामुख्याने जाणवतो.

या चित्रपटाची कथा ही सरळसाधी शोकांतिका आहे. त्यामुळे या कथेची मांडणी किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा ठरतो. मात्र त्यामुळेच या चित्रपटाचा पडणारा प्रभाव हाही वेगवेगळा असू शकतो. मुळात आहे त्या पद्धतीने सरळसोट कथा न मांडता शोनाली यांनी कधीतरी जुन्या आठवणींचे संदर्भ देत कथेला वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कधी तरी कथा २००९ च्या काळात घडत असते, तर कधी ती अगदी १९८४ च्या काळातील जुन्या दिल्लीची सफर घडवून आणते, जेव्हा आदिती आणि निरेन एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. ही कथा फक्त आजारी आएशाची आहे असा विचार करायला गेलो तर मात्र चित्रपट निराशा करू शकतो. मुळातच चित्रपटात खूप भावनिक क्षण आहेत. आएशा पुन्हा एकदा मृत्यूच्या दारात आहे हे लक्षात आल्यानंतर चित्रपट वेगाने पुढे सरकतो. तिच्यावर पुन्हा उपचार सुरू करायचे की हळूहळू येणारा मृत्यू स्वीकारत आहे ते आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार तिला द्यायचा, हा कुठल्याही आईवडिलांसाठी सोपा निर्णय नाही. इथे आदिती आणि निरेन दोघांमध्येही वाद सुरू होतो. सतत चोवीस तास आएशा एके आएशा असा विचार करणाऱ्या आदितीला तिच्यावर उपचार झाल्यानंतरही ती निरोगी आयुष्य जगू शकेल, यावर विश्वास नाही. तर निरेन मात्र डॉक्टरी सल्ल्यानुसार आएशाला आणखी दहा वर्षे जगायला मिळतील, यावर अडून आहे. मात्र हा निर्णय अखेर ते दोघेही आएशावर सोडतात. या चौकोनी कुटुंबाचा आर्थिक कणा निरेन आहे, तर मानसिक कणा आदिती आणि या दोघांनी बांधलेल्या कुटुंबात आएशा-ईशान दोघांनीही आपापले जगणे स्वीकारले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात असूनही या प्रत्येकाचे आपले एक अवकाश आहे. चौघेही जण एकत्र असूनही विचाराने, वृत्तीने स्वतंत्र आहेत. या चौघांच्याही आकाशाचा आपला-आपला रंग आहे आणि तरीही कुटुंब म्हणून एकत्र आल्यानंतर हे सगळे रंग एकमेकांत सहज मिसळून जातात. या कुटुंबाचा जगण्याचा विचार, त्यांची शैली, येणारी प्रत्येक परिस्थिती आपल्या कुवतीनुसार स्वीकारत पुढे जाण्याचा त्यांचा मार्ग हे सगळे दिग्दर्शिके ने कथेच्या ओघात सहजपणे मांडले आहे. दिग्दर्शिकेने मांडलेला हा व्यक्तिरेखांचा आलेख चित्रपटातील कलाकारांनी अचूक पकडला असल्याने हा चित्रपट एक वेगळा अनुभव ठरतो.

‘द स्काय इज पिंक’चा पूर्वार्ध हा काहीसा कंटाळवाणा वाटू शकतो. अनेकदा तो अनुबोधपटाच्या शैलीत समोर येतो. त्यातले काही चुरचुरीत संवाद, आएशा-आदिती यांच्यातील खेळकर प्रसंग किंवा निरेन-आदिती यांच्या तरुणपणातील काही प्रसंग थोडे हलकेफुलके आहेत. फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा ही जोडी बऱ्याच काळाने पडद्यावर एकत्र आली आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री ही अर्थातच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेची गोष्ट आहे, मात्र ती पडद्यावर एखाददुसरा प्रसंग वगळता पाहायला मिळत नाही, अनेक तपशीलही वरवर येतात. ज्यात आएशाचे शिक्षण आणि इतर गोष्टींचा उल्लेख आहे. निरनेची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारलेली पाहायला मिळते, त्याच्या संघर्षांचा वरवर उल्लेख होतो. चित्रपटाची पटकथा आणखी बांधेसूद होऊ शकली असती. प्रियांका चोप्राला पहिल्यांदा इतक्या सक्षम भूमिकेत पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. झायरा वासिम, रोहित सराफ या दोघांनीही तितकेच उत्तम काम केले आहे. आणि फरहान अख्तरने त्याच्या नेहमीच्या सहजशैलीत काम केले आहे, मात्र तुलनेने त्याच्या व्यक्तिरेखेला अजून वाव मिळायला हवा होता. मात्र या चौघांचा अभिनय आणि शोनाली बोस यांचे संयत, संवेदनशील दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट एक वेगळा अनुभव देऊन जातो.

द स्काय इज पिंक

दिग्दर्शक – शोनाली बोस

कलाकार – प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वासिम, रोहित सराफ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The sky is pink movie review abn

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या