छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एक गाथा नव्या कोऱ्या ऐतिहासिक चित्रपटातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराजांची आग्र्याहून सुटका या थरार मोहिमेवर आधारित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा ऐतिहासिकपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या जिजाऊंच्या भूमिकेत आणि अभिनेते यतीन कार्येकर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी याआधीही शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, मात्र मोठय़ा पडद्यावर ते पहिल्यांदाच ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. यानिमित्ताने, खुद्द डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते यतीन कार्येकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन चित्रपटाविषयी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.  शाळेत इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात वाचलेला आग्र्याहून सुटका हा धडा आता मोठय़ा पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डॉ. अमोल कोल्हेंची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्तिक केंद्रे यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही आघाडय़ा यशस्वीपणे सांभाळताना एकीकडे ऐतिहासिक मालिकांची निर्मिती आणि अभिनय अमोल कोल्हे करतच होते. मात्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घेऊन चित्रपट मालिका करण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला इथपासून ते ‘शिवप्रताप गरुडझेप’ची संकल्पना आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या अनुभवापर्यंत विविध विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 एका अमराठी खासदाराची चपराक

 पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि आम्ही केंद्रीय सभागृहात बसलो होतो. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी मला मराठी चित्रपटांची सध्या काय स्थिती आहे? असा प्रश्न विचारला. आमचा हा संवाद सुरू असताना माझ्या शेजारी बसलेल्या अमराठी खासदाराने प्रश्न विचारला की, ‘संसदेत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत भाषणाला सुरुवात करता, ‘चंदन तस्करा’वर चित्रपट येतो आणि तो सहज १०० कोटी पार करतो, ‘सोन्याची खाण’लुटणाऱ्या खाण माफियावर चित्रपट येतो तोही भरघोस कमाई करतो; मग ज्यांना तुम्ही आदर्श मानता त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर इतका मोठा चित्रपट का येत नाही? माझ्यासाठी हीच चपराक होती आणि छत्रपतींना लोकांपर्यंत पोहोचवायला आपण कमी पडतो आहोत याची जाणीव तेव्हा स्पष्टपणे  झाली, असे  कोल्हे यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच या चित्रपटासाठी सात भव्य सेट उभारण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

 प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची धारणा वेगवेगळी असते. त्यामुळे ऐतिहासिक कलाकृती जेव्हा समोर येते तेव्हा तुमची कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारी वाढते. हरतऱ्हेचे प्रेक्षक चित्रपट पाहात असतात, ज्यापैकी काहींना या इतिहासाविषयी अजिबात काही माहिती नाही. काहींना फक्त पाठय़पुस्तकात वाचलेला इतिहास ठाऊक आहे. तर काहींनी उत्सुकता म्हणून वा अभ्यासाच्या दृष्टकोनातून ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्यांना इतिहास माहिती आहे. काहींना तर इतिहास मुखोद्गत आहे. अशा सगळय़ाच प्रकारचे प्रेक्षक आपला ऐतिहासिकपट पाहायला येणार म्हणजे त्या सगळय़ांना आपलासा वाटेल अशा पध्दतीने इतिहास मांडणे ही मोठी जबाबदारी असते, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

 दिल्लीला महाराष्ट्राचं महत्त्व पटवून द्यायलाच हवं

  संसदेत उभं राहिल्यावर महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे बघत असताना प्रादेशिक अस्मिता जितकी ताकदवान असते, प्रादेशिक आवाज जितका बुलंद होतो तेवढा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे दिल्लीला महाराष्ट्राचं महत्त्व अधोरेखित करून देणं हे महत्त्वाचं आहेह्णह्ण, असा राजकीय टोलाही कोल्हेंनी दिल्लीकरांना लगावला. चित्रपटाची मांडणी करतानाही ही भूमिका ठामपणे मांडली असल्याचं त्यांनी सांगितलं, जे चित्रपटाच्या प्रोमोवरूनही सहज लक्षात येतं. 

 जिजाऊंची भूमिका सर्वागसुंदर

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी याआधीही जिजाऊंची भूमिका केली आहे, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली जिजाऊ प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता ‘शिवप्रताप गरुडझेपह्ण या चित्रपटात त्या पुन्हा एकदा जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याबद्दल बोलताना, जिजाऊंची भूमिका साकारत असताना छत्रपतींच्या आयुष्यात आणि त्यांना घडवण्यात जिजाऊंचे काय स्थान होते हे भूमिका साकारताना मला नव्याने उमगत गेले. आणि कितीही वेळा या  महान व्यक्तिरेखेची भूमिका केली तरी पुन्हा एकदा ती साकारण्याची भूल पडतेच, अशी मनमोकळी कबुली प्रतीक्षा यांनी दिली. ‘आणि इतक्या वर्षांनीही ती भूमिका कालबाह्य झालेली नाही. आताच्या काळातही प्रत्येक स्त्रीला मला जिजाऊंसारखे कणखर, खंबीर बनायचे आहे असे वाटत राहते. याहून मोठी पावती नाही. जिजाऊंचे हे महत्त्वच त्यांची भूमिका पुन्हा पुन्हा करण्याच्या मोहात पाडण्यासाठी पुरेसं आहे, असं त्या सांगतात.

 एकाच तरुण आणि म्हातारा औरंगजेब ..

मराठी आणि हिंदी चित्रपटात एक मोठी कारकीर्द घडवलेले अभिनेते यतीन कार्येकर ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात पुन्हा एकदा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. औरंगजेबाची व्यक्तिरेखा ते पुन्हा साकारत असले तरी दोन्ही भूमिकेत काहीसा फरक असल्याचं ते सांगतात. यतीन कार्येकर अमोल कोल्हे यांची निर्मिती असलेल्या ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या ‘सोनी मराठी’वरील मालिकेत औरंगजेबाची भूमिका करत आहेत. याबद्दलचा छोटा किस्सा सांगताना ते म्हणाले, ‘जगदंब क्रिएशन्ससाठीच मी सकाळी  म्हाताऱ्या औरंगजेबाची भूमिका करत होतो तर संध्याकाळी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात तरुण औरंगजेब साकारत होतो’. एकाच व्यक्तिरेखेच्या या दोन काळातील छटा एकाचवेळी रंगवणं हे आव्हान त्यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने पेललं आहे. 

 महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची ख्याती इतकी आहे की त्याविषयी जितके बोलावे तितके कमीच पडते.  महाराजांचा  संपूर्ण इतिहास पुन्हा पुन्हा पाहवासा, ऐकावासा वाटतो आणि दरवेळी तो नव्यमने समजत जातो, अशी भावना या तिन्ही कलाकारांनी व्यक्त केली.  शिवप्रताप गरुडझेपह्ण या चित्रपटातून उलगडणारी शिवरायांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची गाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपटगृहात यावं, अशी विनंती या तिघांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून प्रेक्षकांना केली. प्रेक्षकांना चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्याचं आवाहन करत अमोल कोल्हे, यतीन कार्येकर आणि प्रतीक्षा लोणकर यांनी या रंगलेल्या गप्पांचा समारोप केला.

शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार

 एरव्ही कुठल्या ना कुठल्या मोठय़ा सणाच्या निमित्ताने हिंदीतील मोठा चित्रपट प्रदर्शित होतो, याची आपल्यालाही सवय आहे. त्यामुळे विजयादशमीच्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यामागे काही खास विचार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, ‘राज्य आमचं, भाषा आमची, मुलूख आमचा, मग झेंडे तुमचे नाही आमचेच झेंडे फडकले पाहिजेत, हे आता मराठी चित्रपटसृष्टीने दाखवून दिलं पाहिजे, असं मला वाटतं’.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The thrill agra chhatrapati shivaji maharaj historical movie ysh
First published on: 02-10-2022 at 00:02 IST