सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत शिवकालीन घटनांवर आधारित ऐतिहासिक चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळते आहे. अलिकडेच दिवाळीच्या मुहूर्तावर अभिजीत देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह तब्बल पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु या चित्रपटातील काही प्रसंगांवरून बरेच वाद निर्माण झाले आणि या वादाने राजकीय वळण सुद्धा घेतले. मात्र, प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित पन्हाळा किल्ल्यामधील प्रसंग चित्रित करतानाचा पडद्यामागील क्षणाचा रील व्हिडिओ अभिनेते अशोक शिंदे यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, अशोक शिंदे यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे.

हेही वाचा- माधुरी दीक्षितने आधी प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दिले बोल्ड सीन, नंतर त्याच्याच मुलासह केला रोमान्स

आतापर्यंत हा व्हिडिओ २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता सुबोध भावे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि अभिनेता शरद केळकर याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर साथीदार व बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांनी साकारली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अशोक शिंदे हे किल्ल्याच्या वरच्या बाजूने दोरीला लटकून उलटे खाली येतात आणि दरवाज्यावर उभे असणाऱ्या सिद्दी जौहरच्या दोन सैनिकांच्या माना स्वतःच्या दोन्ही हातांनी आवळून किल्ल्याच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष चित्रपटात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दोरीचे रूपांतर हे पारंब्यांमध्ये करण्यात आलेले आहे. हा थरारक प्रसंग कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरच चित्रित करण्यात आला आहे.

हेही वाचा- मराठमोळ्या ऋता दुर्गुळेचा व्हेकेशन मोड ऑन; पतीबरोबर ‘या’ ठिकाणी करतेय एंजॉय

‘मी माझ्या ३४ वर्षांच्या मनोरंजनसृष्टीतील कारकिर्दीत पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली होती. फुलाजी साकारण्याचा अनुभव छान आणि अविस्मरणीय होता. पडद्यामागच्या क्षणाच्या या व्हिडिओला उदंड प्रतिसाद मिळाला आहे, हे पाहून आनंद झाला. प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो’, असे अशोक शिंदे म्हणतात.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना रायगडावरुन ऑर्डर…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

हा ऐतिहासिक प्रसंग नेमका काय आहे? पन्हाळा किल्ल्याला सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे व सहकारी किल्ल्यात अडकून पडले होते. ‘शाहिस्ते खान किल्ल्यावर कधीही हल्ला करेल, महाराजांना सांगा सतर्क रहा’ हा जिजाऊंचा निरोप घेऊन पन्हाळ्याला पोहोचलेल्या फुलाजींना चहुबाजूला असलेल्या सैनिकांमुळे किल्ल्यात शिरणे सहजशक्य होत नाही. त्यामुळे किल्ल्याच्या वरच्या बाजूने झाडाच्या पारंब्यांवरून लटकून ते खाली येतात आणि सिद्दी जौहरच्या सैनिकांना मारत आत शिरतात. चहूबाजूंनी वेढा घातलेला असताना फुलाजीप्रभू आत शिरले कसे? हा प्रश्न आतमध्ये असणाऱ्या सर्वांना पडतो, असा हा प्रसंग आहे. यावेळी फुलाजींना पाहून आश्चर्यचकित झालेल्या बाजीप्रभूंनी त्यांना ‘इथे मुंगीला शिरायला जागा नाही आणि तू आत कसा आलास?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना, ‘अरे मुंगीला शिरायला जागा नाही, पण हत्तीला शिरायला जागा आहे ना!’ अशा शब्दांत फुलाजींनी आपल्या पराक्रमाचे वर्णन केले.