अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये रणबीर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून सध्या तो या भूमिकेसाठी फार मेहनत घेताना दिसत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रणबीरशिवाय इतरही काही कलाकार झळकणार आहेत. अशाच कलाकारांच्या यादीत सर्वांच्या ओळखीचा एक चेहरा म्हणजे टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना. बिग बॉस फेम करिश्मा तन्ना या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या एका प्रेयसीच्या भूमिकेमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

करिश्मा या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सावरिया’ रणबीरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप या चित्रपटातील करिश्माच्या भूमिकेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. पण, जर का करिश्मा आणि रणबीरने या चित्रपटात एकत्र काम केले तर एका नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे असेही म्हटले जात आहे. संजय दत्तच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच सोनम कपूर आणि अनुष्का शर्मासुद्धा झळकणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अनुष्का यात पत्रकाराची तर सोनम ही संजूबाबा प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाची देखील या चित्रपटात वर्णी लागली असून, ती यात संजूबाबाची दुसरी पत्नी मान्यता हीची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, संजय दत्तच्या देहबोलीपासून ते अगदी त्याच्या वागण्याबोलण्याच्या वेगळ्याच शैलीपर्यंत सारे काही रणबीर चांगलेच आत्मसात करत असल्याचे त्याचे फोटो पाहून लक्षात येते. रणबीर सध्या संजय दत्तच्या भूमिकेसाठी फार मेहनत घेत असून त्यासाठी त्याने काही कार्यशाळांनाही हजेरी लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरने संजय दत्तच्या देहबोलीचे बारकाव्याने निरीक्षण करण्यासाठी जवळपास २५० वेळा संजय दत्तचे चित्रपट, काही व्हिडिओ आणि मुलाखतीचे फूटेज पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.