काळ पुढे सरकला तरीही एखादी नाट्यकलाकृती तितकीच टवटवीत राहू शकते याची अनुभूती पुणेकर रसिक प्रेक्षकांनी स्वातंत्र्यदिनी घेतली. वसंत सबनीस यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘बायकांत पुरुष लांबोडा’ तसेच ‘इन्व्हेस्टमेंट’ आणि शोधन भावे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘इस खेल में हम हो न हो’ या तिन्ही विनोदी एकांकिकांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
हा योग जुळवून आणला ‘नाट्यपुष्प’ संस्थेने आयोजित केलेल्या हास्योन्मेषाच्या त्रयीने. या महोत्सवाची संकल्पना सीमा पोंक्षे यांची होती, त्यांच्या या संकल्पनेला नेहा कुलकर्णी, हेमलता रघू, भालचंद्र करंदीकर या दिग्दर्शकांची आणि कलाकारांची साथ मिळाली आणि रसिक हास्यानंदामध्ये बुडून गेले. हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘नाट्यपुष्प’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. ‘नाट्यपुष्प’च्या तीसहून अधिक नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनयापासून, दिग्दर्शन, नेपथ्य अशा सर्वच आघाड्यांवर कसब पणाला लावून केलेल्या कामाला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली.
आपल्या भाच्याला नाट्य, काव्य, गायन याबरोबरच शरीरसौष्ठवात तरबेज करणाऱ्या मामाची कथा सांगणाऱ्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या एकांकिकेत प्रेक्षकांनी हास्यफवाऱ्यांची मनमुराद गुंतवणूक केली. नीलेश दातार यांनी ‘दिगंबर’ हे पात्र साकारताना देहबोली, संवादावर घेतलेल्या मेहनतीमुळे प्रेक्षकांच्या हास्याने प्रेक्षागृह दणाणून गेले. त्यांना मिळालेली ओंकार दीक्षित, महेश्वर पाटणकर, प्रमोद कुलकर्णी, सुहास संत आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या अभिनय कौशल्याची साथही तितकीच महत्त्वाची ठरली.
हेही वाचा >>> प्रेरक चरित्रपट
ऑफिस स्टाफमध्ये असलेल्या सर्वाधिक बायका, त्यांच्या-त्यांच्यातील कुरबुरी आणि एकजूटही, उच्च पदावर बसलेल्या एकुलत्या एक पुरुषाला कशी त्रासदायक ठरते, त्याची कथा ‘बायकांत पुरुष लांबोडा’ या एकांकिकेत होती. अशा या बिचाऱ्या व्यवस्थापकाची, पेडकर ही भूमिका अत्यंत चोख बजावली ती सतीश चौधरी यांनी. बायकांच्या कचाट्यात अडकलेल्या त्या बिच्चाऱ्या व्यवस्थापकाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. काटे, कर्णिक, धाकटे, दांडे, तारकुंडे बाईंची भूमिका करणाऱ्या रविबाला लेले, अनघा देढे, प्राची देशपांडे, मनीषा काळे, हेमा महाबळ, तसेच गणू शिपायाच्या भूमिकेतील उमेश खळीकर आदींच्या भूमिकांनी या एकांकिकेत उत्तम रंग भरले.
पृथ्वीवर स्वर्ग साकारण्याची तयारी दाखवणाऱ्या स्त्रीच्या मनातील घालमेल ‘इस खेल में हम हो न हो’ या एकांकिकेतील स्त्री पात्रांनी दाखवली होती. खरा स्वर्ग मरणानंतर नसून तो पृथ्वीवरच आहे, हे सांगत असताना पृथ्वीवर स्त्रियांकडे पुरुषांचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना मिळणारी वागणूक अशा व्यथा या एकांकिकेत अनघा गुपचुप, ऋतुजा शिरगावकर, माधवी साठे, स्नेहल ताम्हणकर, रेखा जोशी, सविता चौधरी, रेखा गोवईकर यांनी मांडल्या होत्या. स्वर्गातील व्यवस्थापक ‘चित्रा गुप्ता’ यांच्या भूमिकेतील अश्विनी परांजपे, तसेच रश्मी वैद्या, वर्षा देशमुख, सीमा वर्तक आणि प्रांजली आंबेटकर यांनी त्यांना साथ दिली. स्त्रीभृण हत्या या समस्येवरील जनजागृती या एकांकिकेत विनोदी अंगाने करण्यात आली होती. कलाकार आणि रसिक प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळाल्याचे पाहून केलेल्या श्रमाचे चीज झाल्याची भावना सीमा पोंक्षे यांनी व्यक्त केली. या नाट्यकलाकृतींचे सादरीकरण हौशी कलाकारांनी केले असले, तरी अत्यंत निष्ठापूर्वक सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली होती हेदेखील तितकेच महत्त्वाचे.
shriram.oak@expressindia.com