scorecardresearch

रुपेरी पडद्यावरील फुलराणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

man ti fulrani cast
रुपेरी पडद्यावरील फुलराणी

पुलंच्या लेखणीतून उतरलेली ‘ती फुलराणी’ आजच्या पिढीलाही तितकीच भावते. मात्र नाटय़कृतीवरून प्रेरित होऊन त्यावर चित्रपट करताना लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत कसा विचार करावा लागतो, काय आव्हानं येतात याविषयी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

‘व्हॉट्सअप लग्न’, ‘घे डबल’ सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शनाचा अनुभव आणि रुपेरी पडद्यावरील ‘नटसम्राट’च्या निर्मितीचा अनुभव घेतल्यानंतर ‘फुलराणी’ची कथा रुपेरी पडद्यावर आणण्याचा विचार खूप आधीपासून डोक्यात घोळत होता, असं विश्वास जोशी सांगतात. ‘मी सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे यांचं ‘ती फुलराणी’ पाहिलं होतं. शिवाजी मंदिरला मी तो प्रयोग पाहिला होता. त्यातला फिरता रंगमंच.. गजरे विकायला आलेली शेवंता हे सगळं पाहून खूप प्रभावित झालो होतो.

‘घे डबल’ हा माझा चित्रपट पूर्ण झाला, त्याचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू असताना ‘फुलराणी’ चित्रपट करावा हे डोक्यात आलं होतं, पण या नाटकापासून प्रेरणा घेत आजचा चित्रपट करावा की नाटकासारखी पीरियड फिल्म करावी, याबद्दल मनात गोंधळ सुरू होता’, असं सांगतानाच हा गोंधळ दूर करण्यासाठी त्यांनी काय केलं याचीही आठवण त्यांनी सांगितली. ‘मी सात-आठ वेळा नाटक यूटय़ूबवर पाहिलं, ‘पिग्मॅलियन’ वाचलं, ‘माय फेअर लेडी’ पाहिला. मग असं लक्षात आलं ‘पिग्मॅलियन’चे हे सगळे आशय अवतार भाषेच्या मुद्दय़ाला हात घालणारे आहेत. दुसरं ‘नटसम्राट’च्या वेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर असं म्हणाले होते की पडद्यावर तुम्हाला दृश्यात्मक भव्यदिव्य असं काही उभं करावं लागतं, तर ते प्रेक्षकांना आकर्षक वाटेल. तिथे मला हा सौंदर्यस्पर्धेचा विषय दिसला. ‘मला काहीतरी आयुष्यात बनायचं आहे’ हे ध्येय हल्ली १०-१२ वर्षांच्या मुलांपासून ते मोठय़ांपर्यंतच्या मनात सुरू असतं. त्यामुळे आजच्या पिढीला भावेल अशी ही संकल्पना मध्यवर्ती घेऊन ‘फुलराणी’ चित्रपटाची तयारी सुरू झाली’, असं ते म्हणाले.

 नाटकातलीच भूमिका करायला मिळाली.. 

या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे यांनी शेवंता तांडेलच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याबद्दल बोलताना, जेव्हा ‘ती फुलराणी’ नाटकात काम करायची संधी मिळाली होती तेव्हा मी शेवंताच्या वडिलांची भूमिका केली होती आणि योगायोग म्हणजे चित्रपटातही मला तीच भूमिका साकारायला मिळाली. या नाटकावर आधारित असलेला चित्रपट भविष्यात कधीतरी येईल आणि मला त्यातही पुन्हा हीच भूमिका करायची संधी मिळेल, असं कधीही वाटलं नव्हतं. पण ही एक आठवण माझ्याबरोबर कायम राहील’, असे मिलिंद शिंदे यांनी सांगितलं. नाटकावर आधारित चित्रपट करणं ही सोपी गोष्ट नाही, लोकांना चित्रपट पाहतानाही नाटकच पाहतोय असं वाटण्याची शक्यता असते. विश्वास जोशींनी दिग्दर्शक म्हणून या नाटकाचं जुनं सगळं पुसून नव्याने आरेखन केलं आहे. माध्यमभान असणाऱ्यालाच गोष्ट पूर्ण नव्याने मांडणं शक्य होतं आणि विश्वास जोशींचं माध्यमभान खूप उजवं आहे, अशा शब्दांत त्यांनी दिग्दर्शकाचं कौतुक केलं.

डुक्कर पकडणाऱ्या माणसावर चित्रपट झाला नसता..

पूर्वी हिरोचा जमाना होता. आनंद, राजेश खन्ना हे खूप महान कलावंत आहेत, पण या कलावंतांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या नावाने ते कधीच ओळखले गेले नाहीत. ते हिरो म्हणून त्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध झाले. तो काळ गेला, आता चित्रपट गोष्टींवर आला. माणूस हा गोष्टींचा केंद्रबिंदू झाला. म्हणजे डुक्कर पकडणाऱ्या माणसावर चित्रपट होऊ शकेल, असं कोणी आधी सांगितलं असतं तर त्याला वेडय़ात काढलं असतं. ‘फँड्री’ आला आणि तो लोकांना आवडला, असं सांगणाऱ्या मिलिंद शिंदेंनी नरिमन पॉइंटपलीकडच्या लोकांचं जगणं, गावाकडच्या लोकांचं जगणं, त्यांच्या गोष्टी सिनेमाने जागतिक नकाशावर नेऊन ठेवल्या याकडे लक्ष वेधलं. ‘फुलराणी’च्या शेवंता तांडेलची गोष्टही अशीच आहे. अशा कित्येक शेवंता आपल्या आजूबाजूला असतील, पण त्यांचं जगणं ठरावीक लोकांपर्यंतच पोहोचतं. सिनेमाने ही गोष्ट बदलली, असं ते ठामपणे सांगतात.

व्यवसायाचं गणित जमवणारे निर्माते कमी..

मराठी चित्रपटाकडे व्यवसाय म्हणून बघणारे खूप कमी लोक आहेत, अशा शब्दांत विश्वास जोशींनी मराठी चित्रपटांसमोरच्या अडचणींविषयी विश्लेषणात्मक मुद्दा मांडला. माझ्याकडे एक-दोन कोटी आहेत म्हणून मी चित्रपट करतो असं म्हणणाऱ्यांमुळे फक्त चित्रपटनिर्मितीचा आकडा वाढतो. याशिवाय, दक्षिणेकडे पहिल्यांदा दाक्षिणात्य चित्रपट पाहिले जातात, तसं आपल्याकडे नाही. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा पहिल्यांदा हिंदी चित्रपट बघतो. मग मराठीत काही वेगळं आहे का तर तो ते पाहायला जातो. त्यामुळे अशा प्रेक्षकाला आपल्या चित्रपटाकडे खेचून आणण्यासाठी मग आम्हाला कथेवर जबरदस्त काम करावं लागतं, ‘फुलराणी’सारखं शीर्षक असावं लागतं. चांगले कलाकार लागतात. त्या तुलनेत बजेट्स कमी आहेत. निर्मितीचा, प्रसिद्धीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे याचा व्यवसाय म्हणून विचार करणं गरजेचं आहे. जे करणारे फक्त सात ते आठ निर्माते आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.  एकल निर्मिती करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने गोंधळ अधिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

‘ नकाराची तयारी करूनच ऑडिशन दिली’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ‘फुलराणी’ चित्रपटाची नायिका शेवंताची भूमिका साकारते आहे. इतकी चांगली भूमिका आपल्याला मिळेल याची कल्पनाच नसल्याने नकाराची तयारी ठेवूनच ऑडिशन दिल्याचं प्रियदर्शिनीने सांगितलं. ‘तुला शिकवीन चांगला धडा’ हे स्वगत इतक्याजणींनी इतक्या सुंदर पद्धतीने याआधी सादर केलेलं आहे. त्यात आता मी वेगळं काय करणार? असं मला वाटलं होतं. एवीतेवी मला हे भूमिका देणार नाही आहेत, केवळ ऑडिशनसाठी बोलावलं आहे तर काही वेगळेपणा त्यात आणता येईल का? असा विचार केला. त्याच्याआधीच माझे तीन-चार नकार पचवून झाले होते. पण सहजतेने दिलेली ऑडिशन विश्वास जोशींना खूप आवडली. पहिल्यांदा त्यांनी भेटायला बोलावलं तेव्हाही आपल्याला ही भूमिका मिळणारच नाही आहे हाच विचार डोक्यात होता. त्यामुळे कुठलंही दडपण न घेता मी त्यांना भेटायला गेले आणि गप्पा मारत होते. बहुधा त्यांना माझ्यातला तो मोकळेपणाच आवडला असावा, अशी आठवण प्रियदर्शिनीने सांगितली.

‘ओटीटी कंपन्या मराठी चित्रपटांना सरळ नकार देतात’

बोलीभाषा आणि प्रमाणभाषेचा विचार करताना प्रमाणभाषा कोणी ठरवली? हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या वादात पडण्यापेक्षा आज मी मराठी म्हणून जगात कसा उभा राहू शकेन याचा खरं तर विचार करायला हवा. आपण मराठी भाषा टिकणार की नाही याबद्दल बोलतो आहोत, पण आज नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टारसारख्या मोठमोठय़ा ओटीटी कंपन्यांनी सांगितलं आहे की मराठी चित्रपट आम्ही घेत नाही. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हे कसं काय चालवून घेतलं जातं?, असा प्रश्न विश्वास जोशींनी उपस्थित केला. मराठी चित्रपटांना या ओटीटी कंपन्यांकडून भाषेच्या मुद्दय़ावर नाकारलं जातं आहे, या मुद्दय़ावर कोणीच भांडत नाही. मराठी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि तरी ती नाकारली जाते, हा मुद्दा सोडून आपण आपापसातच भांडतो आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

सिनेमाला आवश्यक भाषा द्यायला हवी..

सिनेमाच्या विषयाचा गाभा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जी बोलीभाषा लागते ती त्याच पद्धतीने वापरायला हवी. पण कलावंत म्हणून चार लोकांत जेव्हा तुम्ही वावरत असता तेव्हा तुम्ही काय बोलता, कशा पद्धतीने बोलता याचं निरीक्षण केलं जातं. त्यामुळे कलावंतांनी बोलताना काळजीपूर्वक बोलायला हवं. दुसरं आपली आई जी भाषा बोलते ती प्रमाणभाषा असं मी मानतो. सिनेमाला जे आवश्यक आहे ते सिनेमात ठेवावं आणि जगाला जे आवश्यक आहे ते त्या पद्धतीनेच द्यायला हवं, असं आग्रही मत मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:02 IST