रेश्मा राईकवार

काळ बदलला, आधुनिक सोयीसुविधा-उच्चशिक्षणाच्या सोयी झाल्या. माणूस सुसंस्कृत होण्याच्या दृष्टीने आवश्यक असे सगळे प्रगतिशील वातावरण आजूबाजूला निर्माण झाले तरी माणसाची वृत्ती काही बदलत नाही. त्यामुळे गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अडाणी असे आर्थिक-जातीय स्तरावरील भेदाभेद काही राहिलेले नाहीत, असं सहज आपण कधी तरी म्हणून जातो. मात्र खरंच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’मधला संघर्ष संपला आहे का? किंवा तो संपावा अशी मुळातच समाजमानसाची धारणा आहे का? याचा विचार करायला लावणारी कथा लेखक जयंत पवार यांनी लिहिली त्याला जवळपास एक तपाहून अधिक काळ उलटून गेला आहे. आणि तरीही त्यावर आधारित ‘भाऊबळी’ हा चित्रपट पाहताना ती किती कालसुसंगत आहे ही जाणीव मनाला असाहाय्य करून जाते.

एखादी कटू गोष्ट गळी उतरवायची असेल तर ती साखरेत घोळवावी लागते. तसं समाजातील दोन वर्गाचा संघर्ष मांडणारी किंबहुना त्या दोहोंपैकी कुठे तरी असलेल्या आपल्या प्रत्येकाचा खरा चेहरा दाखवणारी जयंत पवारांची सत्यकथा मांडताना दिग्दर्शक म्हणून समीर पाटील यांनी ती विनोदात घोळवून आपल्यासमोर आणली आहे. ‘भाऊबळी’ या नावाप्रमाणेच भाऊ आणि बळी या दोन त्या त्या समाजाच्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातील संघर्षांची ही कथा आहे. सिद्धेश सोसायटी आणि त्या सोसायटीसमोर असलेली जिजामाता नगर झोपडपट्टी. या दोन्हीकडच्या माणसांचं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. या सोसायटीत राहणाऱ्या तथाकथित उच्चभ्रूंना लागणाऱ्या दूध, पेपरपासून ते प्लंबिंग, धुणी-भांडी वगैरे सगळय़ा सेवा-गरजा या जिजामाता नगरच्या लोकांकडून पुरवल्या जातात. बाकी तसं म्हटलं तर या दोन्हीकडच्या लोकांचा परस्परांशी जिव्हाळा वा सुसंवाद असण्याचं कारण नाही. उच्चभ्रूंकडून या खालच्या वर्गातील होणाऱ्या लोकांशी प्रेमळ संवाद हा वरवरचा आणि गरजेपुरता आहे. प्रत्यक्षात किती गलिच्छ राहतात हे.. हा मूळ विचार त्यांच्या डोक्यातून कधीच जात नाही. तर कामापुरता या उच्चभ्रू लोकांशी येणारा संबंध सोडला आणि त्यांच्या श्रीमंतीबद्दल वाटणारं नवल सोडलं तर बाकी जिजामाता नगरच्या लोकांना त्यांच्याविषयी फार देणंघेणं नाही. तरीही व्यवहारापुरता का होईना काहीएक विश्वासाचा धागा त्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो.

भाऊ म्हणजे आवळस्कर आणि बळी म्हणजे आवळस्करांकडे दूध टाकणारा बळीराम. बळीरामचे दोन महिन्यांचे दुधाचे पैसे आवळस्करांनी दिलेले नाहीत, असं त्याचं म्हणणं. त्याच्या म्हणण्यानुसार तो हिशोबात चोख आहे. तर आवळस्करांच्या बायकोचं- रमाचं म्हणणं की, तिने पैसे दिलेले आहेत. ती कधीही विसरत नाही. तुम्ही मला पैसे दिलेले नाहीत, मी एवढं आर्थिक नुकसान कसं भरून काढणार? ही बळीची प्रामाणिक तगमग आणि आम्ही पैसे दिले आहेत. आमच्याकडून चूक होऊ शकत नाही. तुमच्यावर पैसे उधळायला आमचे पैसे वर आले नाहीत.. इथपासून या वादाची सुरुवात होते. हळूहळू हे वाग्युद्ध मारामारीचं रूप घेतं. मग हा संघर्ष फक्त भाऊ आणि बळी यांच्यापुरता राहत नाही. तो सिद्धेश सोसायटी विरुद्ध जिजामाता नगर आणि परिणामी उच्चस्तरीय आणि निम्नस्तरीय असा वाढतच जातो. बरं गोष्ट म्हटली की त्याचा उचित शेवटही आपल्याला अपेक्षित असतो. इथे या वादातून दोन्हीकडच्या व्यक्तींच्या छुप्या प्रवृत्ती बाहेर पडू लागतात. कधी तरी नाहीतून ‘आहे रे’पर्यंत पोहोचलेले निवृत्त न्यायाधीश यातून मध्यस्थी साधायचा प्रयत्न करतात, पण ते प्रयत्न दोन्हीकडून हाणून पाडले जातात. पुढची पिढी अधिक शहाणी म्हणावी तर ती अभ्यासातून फक्त आपल्यापुरता सुटकेचा विचार करताना दिसते आणि पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकते. यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही का? असेल तर तो कुठला? याची उत्तरं लेखक आपली आपल्यालाच शोधायला लावतो.

या चित्रपटाचा विषय मुळात खूप गंभीर आहे, पण दिग्दर्शकाने विनोदी पद्धतीने मांडणी केली असल्याने वरवर चेहऱ्यावर हसू उमटतं; पण हे विनोदी नाही, याची जाणीव आपल्याला आत होत राहते, हेच या चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे. हा विषय त्याच ताकदीने पोहोचवणारे किशोर कदम, मनोज जोशी, रसिका आगाशे, मेधा मांजरेकर, राजन भिसे, संतोष पवार, हृषीकेष जोशी ते आशय कुलकर्णीपर्यंत नव्या-जुन्या कलाकारांची एक उत्तम फौज या चित्रपटात आहे. त्यामुळे आशय आणि अभिनयाची जुगलबंदी दोन्हीत हा चित्रपट सरस ठरतो. किशोर कदम यांनी साकारलेला बळी जितका सहज, अप्रतिम आहे तितक्याच सहजपणे मनोज जोशी यांनी भाऊची भूमिका केली आहे. हृषीकेश जोशींनी त्यांच्या वाटय़ाला आलेल्या सगळय़ा छोटय़ा प्रसंगांत कमाल केली आहे. अर्थात, हा विषय अधिक खोल जाऊन संयत मांडणीनेही सादर करता आला असता. काही काही ठिकाणी विनोदाच्या नादात ही मांडणी भडक झाली आहे; पण मुळात जयंत पवार यांच्यासारख्या संवेदनशील लेखकाची आजच्या काळातील सामाजिक स्थितीशी सुसंगत ठरेल अशी कथा आणि चांगल्या कलाकारांची साथ लाभलेला हा ‘भाऊबळी’ निश्चितच वेगळा अनुभव देतो.

भाऊबळी

दिग्दर्शक – समीर पाटील

कलाकार – किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, रेशम टिपणीस, राजन भिसे, संतोष पवार, मानसी कुलकर्णी, आशय कुलकर्णी