‘डेडपूल’ सुपरहिरोपटातील अभिनेता टी. जे. मिलरला पोलिसांनी अटक केली. १८ एप्रिल रोजी मध्यरात्री ९११ या आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने न्यू जर्सीमधील एका ट्रेनमध्ये एक बाई बॉम्ब घेऊन फिरत असल्याची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या फोनची गांभीर्याने नोंद घेतली. त्यानंतर लगेचच बॉम्ब पथकाच्या मदतीने शहरातील सर्व ट्रेन्सचा कसून तपास सुरू करण्यात आला. प्रत्येक रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज अगदी बारकाईने तपासून पाहिले गेले. परंतु बॉम्ब पथकाच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान पोलिसांनी फोन करण्याऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधून काढला. आणि त्यांच्या हाती दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द ‘डेडपूल’ फेम टी.जे.मिलर लागला.

फोन मिलरनेच केला आहे, याची खात्री पटताच त्याला बेडय़ा ठोकून चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. पुढे चौकशी सुरू होता क्षणी त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार त्या रात्री तो जबरदस्त दारूच्या नशेत होता. आणि त्या नशेतच त्याने अनवधानाने पोलिसांना हा फोन केला. सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला स्वस्तात सोडले जाईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पोलीस वरिष्ठांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. आणि दुसऱ्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.आश्चर्याची बाब म्हणजे न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ज्यावेळी त्याला पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले त्यावेळी देखील तो दारूच्या नशेतच होता. तसेच त्याचा फोन चोरीला गेला होता. पण त्यावेळी नशेत असल्यामुळे त्याला तक्रार करणे शक्य झाले नाही. परंतु दुसऱ्या दिवशी तक्रार करायला जाणार तेवढय़ात पोलिसांनी त्याला घरातच अटक केली.

पुढे पोलिसांनी घाबरवल्यामुळे लगेचच त्याने न केलेला गुन्हा देखील मान्य केला, अशी मांडणी न्यायालयात मिलरच्या वकिलांनी केली. न्यायालयात त्याने केलेला गोंधळ पाहून पोलीसही चक्रावले. आणि त्याच्या विरोधात आणखीन ठोस पुरावे गोळा करण्यासाठी थोडा वाढीव वेळ मागितला. जर मिलरविरुद्ध हा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ सुपरहिट झाल्यानंतर आता चाहते माव्‍‌र्हलचा अगामी चित्रपट ‘डेडपूल २’ची वाट पाहत आहेत. टी. जे. मिलरची या सुपरहिरोपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. परंतु त्याच्याविरोधात सुरू झालेल्या या खटल्यामुळे आता ‘डेडपूल २’च्या चित्रीकरणातही अडथळे येऊ लागले आहेत.