‘पद्मावत’पुढे झुकला ‘पॅडमॅन’?

‘पॅडमॅन’चे प्रदर्शन पुढे ढकलल्याची चर्चा

padmaavat and padman
'पॅडमॅन'चे प्रदर्शन पुढे ढकलल्याची चर्चा

अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी केलेल्या ट्विटनंतर या चर्चांना उधाण आले आहे. संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ हा चित्रपटसुद्धा २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ‘पद्मावत’शी टक्कर होऊन नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

‘पॅडमॅन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर २५ जानेवारीला ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित होईल,’ असे ट्विट कोमल नाहटा यांनी केले. ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाची जितकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे, तितकीच अक्षयच्या ‘पॅडमॅन’विषयीसुद्धा पाहायला मिळत आहे. ‘पॅडमॅन’च्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यास कमाईत फटका बसणार याची शक्यता नाकारता येत नव्हती.

VIDEO : ‘पद्मावत’चा नवीन टीझर पाहिलात का?

‘पॅडमॅन’च्या निर्मात्यांकडून किंवा अक्षय कुमारकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ९ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीचा ‘अय्यारी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे नाना पाटेकरांचा ‘आपला मानूस’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: To avoid clash with padmaavat akshay kumar padman film postponed to february