जान्हवी पणशीकर-सिंग

‘तो मी नव्हेच!’ या आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर अभिनित नाटकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने येत्या ८ ऑक्टोबरला रवींद्र नाटय़मंदिरात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.. 

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

१४ मार्च २२ रोजी गोव्याला बाबांच्या (प्रभाकर पणशीकर) स्मृतिदिनाचा कार्यक्रम त्यांच्या जन्मगावी.. पेडण्यात आयोजित करण्यात आला होता. पडदा उघडला तेव्हा आम्ही सारे स्टेजवर होतो, पण आमचे चेहरे दिसत नव्हते. कारण आम्ही सर्वानी बाबांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधले मुखवटे घातले होते. कोणी लखोबा, तर कोणी राधेश्याम, कोणी दाजीशास्त्री, तर कोणी औरंगजेब असे फक्त बाबांचे विविध चेहरे दिसत होते. त्या पहिल्या दृश्यालाचा गोवेकर रसिकांनी कडकडून टाळी दिली. विघ्नेश जोशीने निवेदन सुरू केले. ‘पणशीकरांची गोष्ट सांगणारे आम्ही कोण? आम्ही सारे पणशीकरांचे शिष्य!’ हे वाक्य संपताना आम्ही सर्वानी आपापले मुखवटे बाजूला करायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे मुखवटे उतरवलेही.. परंतु एक गोष्ट मात्र अभावितपणे घडली. विघ्नेशने बाबांचे नाव घेतले मात्र- आणि आम्हा कोणालाही अश्रू आवरेनात.

बाबांनी आयुष्यात नेमके काय मिळवले याची प्रचीती तेव्हा आली. बाबा जाऊन तब्बल ११ वर्षे झाल्यावरही नुसत्या त्यांच्या नावाच्या पुकाऱ्याने सर्व भावुक झाले होते. सहकलाकारांचे असे प्रेम क्वचितच कोणा नटाच्या, निर्मात्याच्या वाटय़ाला आले असेल. महिन्याला २०-२५ प्रयोग करत गावोगावी हिंडत हीच तर मंडळी सतत बाबांच्या सोबत असत. आम्हा मुलांपेक्षाही बाबांचा सहवास त्यांना अधिक लाभला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

१९६२ साली ‘तो मी नव्हेच’चा पहिला प्रयोग झाला. तिथपासून २००८ पर्यंत बाबांच्या आयुष्यातील जवळजवळ ४५-४६ वर्षे या नाटकाने व्यापून टाकली होती. नाटकाचे जेव्हा २८०० हून अधिक प्रयोग होतात तेव्हा नटसंच किती वेळा बदलला गेला असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यात ‘तो मी नव्हेच’सारखे जवळजवळ १५-२० पात्रे असलेले नाटक. कितीतरी नट दोन-तीन भूमिका करायचे. काही तर अगदी दोन-चार वाक्ये असलेली किरकोळ पात्रे . वेणूसारखे दोन-अडीच वाक्यांचे पात्र किंवा एका प्रवेशापुरता येणारा तबलजी तर दर प्रयोगाला नवा असायचा. बाहेरगावच्या दौऱ्यामध्ये इतकी माणसे घेऊन जाण्यापेक्षा त्या, त्या गावातील लोक घेणे जास्त सोयीचे व्हायचे. त्यामुळे बस गावात पोचली की वेणूच्या शोधात बाहेर पडायचे, हे नंदू पणशीकर आणि सुरेश पांचाळचे एक कामच होते. तीच गोष्ट मोठय़ा भूमिकांची. इतके सलग प्रयोग करणे कोणालाही शक्य व्हायचे नाही.  कोणाची तरी अडचण असायचीच. त्यामुळे ‘तो मी नव्हेच’ नाटकाचे कितीही प्रयोग झाले तरी नाटय़संपदेच्या कार्यालयात, प्रवासात बसमध्ये, अगदी ऐनवेळी थिएटरवरसुद्धा कोणा ना कोणाची तरी तालीम चालूच असायची. यज्ञशाळेतील अखंड अग्निहोत्राप्रमाणेच या नाटय़शाळेत अखंड नाटय़कुंड धगधगत ठेवायचे काम बाबा करत होते. त्यात या सर्व कलाकारांची त्यांना मनापासून साथ होती. त्यात मीही एक.. जान्हवी- बाबांची लाडकी ‘जानू’.. बाबांच्या अभिनयाची एकमेव वारसदार!

‘तो मी नव्हेच!’ हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा मी चार वर्षांची होते. म्हणजे मी आणि ‘तो मी नव्हेच!’ हातात हात घालूनच मोठे झालो. पहिल्या प्रयोगाची लगबग तर मी फक्त पाहिली होती.. आईच्या मांडीवर बसून. पण बाबा जे काही रंगमंचावर करीत ते फार अप्रतिम होते. पुढे वयाच्या तेराव्या वर्षी मी ‘तो मी नव्हेच!’मधली वेणू बनले. त्यानंतर प्रमिला परांजपे आणि नंतर सर्वात महत्त्वाची भूमिका सुनंदाही मी साकारली. अचानक अडचण आली तेव्हा ‘गंगुताई घोटाळे’ ही विनोदी भूमिका आणि ‘चंद्राबाई चित्राव’ही मी केली. २००० प्रयोग झाले त्या सुमारास बाबांनी माझ्याकडून बॅ. विप्रदास ही मूळ पुरुषाची सरकारी वकिलाची भूमिकाही करून घेतली. त्याचा त्यांना खूप अभिमान वाटला. बाबा म्हणायचे, ‘जान्हवी म्हणजे आमच्या नाटय़संपदेच्या भात्यातलं अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारं एक कायमचं ठेवणीतलं अस्त्र आहे.’

फार थोडय़ा लोकांना माहीत असेल की, बाबांनी कानडी भाषा, लिपी शिकून ‘तो मी नव्हेच!’ हे नाटक ‘अवनु नानल्ला’ या नावाने कानडीत सादर केले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही त्यात प्रमिला परांजपेचे काम केले. पण मी कानडी भाषा शिकले नव्हते की लिपी! मी फक्त नाटकातले माझे कानडी संवाद पाठ केले होते. पण माझी भूमिका इतकी सराईतासारखी झाली की मला कानडी येत नाही, यावर खुद्द कानडी लोकांचाही विश्वास बसत नसे.

 ‘गाव तिथे एसटी’ या धर्तीवर ‘गाव तिथे नाटय़संपदाची बस’ पोचत असे. रात्री-बेरात्री प्रयोग संपत. त्यानंतर बस पुढच्या मुक्कामी जायची. पण बाबा कधी प्रवासात झोपलेले कोणी पाहिले नाहीत. आपल्यावर या नाटय़कुटुंबाची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांची जबादारी आहे या जाणिवेने कुटुंबप्रमुखाच्या नात्याने ते स्वत: सावध राहायचे आणि रात्रभर जागून आमच्या मुकुंदा ड्रायव्हरला सोबत करायचे.

कोकण-गोव्यात प्रयोग खूप उशिरा सुरू होतात. म्हणजे रात्री साडेदहाला! लोक सुशेगात येतात. मग नाटक संपायला केवढा उशीर होत असे हे सांगायला नकोच. त्यामुळे आम्हाला कोणी जेवण द्यायला तयार नसायचे. मग बाबांनी स्वत:चा भोजन विभाग सुरू करायचे ठरवले. झाले! आमच्या ‘तो मी नव्हेच!’मध्ये पुष्कळ बायका ना ! सगळ्या उत्साहाने पदर खोचून उभ्या राहिल्या. सगळ्यांची मुखिया होती आमची शमा वैद्य. २५-३० माणसांचा स्वयंपाक आमचे महिला मंडळ हौसेने करायच्या. पण त्यामुळे व्हायचे असे-  की नाटक संपताना स्वयंपाक तयार हवा म्हणून आधीच तयारी सुरू व्हायची. आणि नेमके जज्च्या निकालवाचनाच्या  अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर प्रसंगी आतून कूकरच्या शिट्टय़ांचा आवाज यायचा. आणि मग बाबांची  चिडचिड व्हायची.

बाबांचे वय वाढू लागले. तब्येतीच्या तक्रारी सुरूच होत्या. हार्टचे दुखण, डोळे अधू. पण जिद्दीने ते प्रयोग करत राहिले, ते या सर्व कलाकार मंडळींनी त्यांना साथ दिली आणि पावलोपावली त्यांची काळजी घेतली म्हणूनच. बाबा आता फक्त माझेच नाही, तर नाटय़संपदेतील सर्वाचेच ‘बाबा’ झाले होते. ‘तो मी नव्हेच!’ हे नाटक आले तेव्हा ते फक्त ‘पणशीकर’ होते. आपल्या कर्तृत्वाने पुढे ते नाटय़सृष्टीचे ‘पंत’ झाले. आणि मग या मोठय़ा कुटुंबाचे ‘बाबा’! आमच्या या कुटुंबात कुरबुरी नव्हत्या असे नाही. पण बाबांचा शब्द शेवटचा असायचा. वातावरण हसतेखेळते कसे ठेवायचे याचे तंत्र त्यांना चांगलेच अवगत असायचे. नाटय़संसार राखायचा म्हणजे माणसे राजी राखावी लागतात याचे भान त्यांना कायम असायचे. त्यामुळेच ते सर्वाना आपले वाटत. बाबांबरोबरचा तो काळ, ‘तो मी नव्हेच!’चे ते दिवस म्हणजे आम्हाला आपल्या आयुष्यातला सुवर्णकाळच वाटतो. आज ‘तो मी नव्हेच!’ला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. हे नाटक म्हणजे बाबांचा जीव की प्राण! नाटक करणे हा त्यांचा एकच ध्यास होता. कित्येक कलाकारांनी या नाटकाचे ५०० च्या वर प्रयोग केले आहेत. मी स्वत: नाटकातल्या जवळजवळ सर्व स्त्री-भूमिका केल्या आहेत. लखोबा सोडून सर्व पुरुष भूमिका केलेलेही  अनेक जण आहेत. आमचे वासुकाका, भिडेकाका, काणेकाका, बापुसाहेब सुरतकर, गोटय़ा सावंत, सुनिल दातार, विकास जोशी,  दिनेश कोयंडे, मीराकाकू, शिल्पा, कल्याणी, शीला, वृंदा, वीणा, ज्योती किरकिरे, चंदू जोशी, मोहन साटम.. जागेअभावी सर्वाची नावे घेता आली नाहीत, तरी शेवटच्या प्रयोगापर्यंत पडेल ती भूमिका करून नाटक थांबू न देणारे हे सर्व कलावंत या नाटकाच्या विक्रमी यशाचे मानकरी आहेत, हे नि:संशय!