‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित केलेले पहिलेवहिले चित्रपट रसिक संमेलन रविवार, ४ जून रोजी पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे सुरू होत आहे. स्किन सिटी चित्रपट रसिक संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि पटकथालेखक मधुर भांडारकर आहेत, तर या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
तरुण वर्गाला चित्रपट चळवळीशी जोडून घेणे, उपक्रमशीलता वाढवणे या उद्देशाने हे चित्रपट रसिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट चळवळ देशभर पोहोचवण्यासाठी चार दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या पत्रकार, समीक्षक, लेखक सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संमेलनस्थळाचे नामकरण स्व. सुधीर नांदगावकर सभागृह असे करण्यात आले आहे. या संमेलनात फेडरेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, मृणाल कुलकर्णी, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष संयोजक वीरेंद्र चित्राव, स्किन सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन ढेपे आणि आशय फिल्म क्लबचे सचिव सतीश जकातदार यांनी दिली. या संमेलनाच्या निमित्ताने ‘फिल्म सोसायटी चळवळीने आम्हांस काय दिले?’ आणि ‘चित्रपट संस्कृतीचे बदलते प्रवाह’ अशा दोन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात सचिन कुंडलकर, गजेंद्र अहिरे, आदित्य सरपोतदार, डॉ. सलील कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, समर नखाते, अशोक राणे, सुनील सुकथनकर, निपुण धर्माधिकारी, परेश मोकाशी, भीमराव मुडे, गणेश मतकरी, राहुल सोलापूरकर, मेघराज राजेभोसले आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.



