२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंधाधून’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्याच्या लोकप्रियतेनंतर तो चीनमध्ये ‘पियानो प्लेअर’ नावानं प्रदर्शित झाला. गेल्या वर्षभरापासून चीनमध्ये भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. यापूर्वी चीनमध्ये केवळ आमिर खानच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग होता. मात्र आता बॉलिवूडधील अनेक चित्रपट चीनमध्ये सुपरडुपर हिट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चीनमध्येही तिकीटबारीवर तुफान कमाई केली.

१. अंधाधून –

आयुष्यमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेला ‘अंधाधून’ हा चित्रपट चीनमध्ये नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट चीनच्या प्रेक्षकांना भावला असून त्याने आतापर्यंत १५०.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

२. दंगल –

आमिर खान आणि झायरा वसिम यांची मुख्य भूमिका असलेला ‘दंगल’ या चित्रपटाला चीनमध्ये दणदणीत प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट चीनमध्ये ७ हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चीनमध्ये तब्बल १ हजार ३३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं.

३. सिक्रेट सुपरस्टार –
चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची गाडी चिनी सिनेमागृहात सुस्साट पळताना दिसली. या चित्रपटानं केवळ दोन दिवसांमध्ये १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत केवळ चीनमध्ये या चित्रपटाने ८१३ कोटींची कमाई केली होती. ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम हिची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या कथानकाची अनेकांनीच प्रशंसा केली होती. चित्रपटाच्या कथानकासोबतच झायराने साकारलेल्या भूमिकेनेही प्रेक्षक आणि समीक्षकांची मनं जिंकली होती.

४. बजरंगी भाईजान –
सलमान खान आणि करिना कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ‘दंगल’ चित्रपटानंतर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाला चीनमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटानंतर सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’लाही चीनच्या प्रेक्षकांची तेवढीच पसंती मिळाली. या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ३१४ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

५. हिंदी मीडियम –
सलमान खान आणि आमिर खान या दोघांच्याही चित्रपटांना चीनमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटांच्या यशानंतर आता अभिनेता इरफान खानचे चित्रपटही चीनच्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. इरफानची मुख्य भूमिका असलेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाने २२६ कोटी रुपयांची कमाई केली होती.

६. हिचकी –
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांपेक्षा चिनी प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद राणीसाठी अनपेक्षित असाच होता. कारण भारतीय बॉक्स ऑफिसच्या तुलनेत राणीच्या ‘हिचकी’नं दुप्पट कामाई चीनमध्ये केली होती. या चित्रपटाने चीनमध्ये १५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.