Toxic Movie Box Office Collection Day 3: कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली होती आणि चर्चा पाहता तो कमाईचे विक्रम मोडेल असं वाटत होतं. पण जबरदस्त ओपनिंगनंतर दुसऱ्या आणि आता तिसऱ्याही दिवशी टॉक्सिकच्या कमाईत मोठी घट झाली आहे. रक्षाबंधनच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ‘टॉक्सिक’ने किती कलेक्शन केले? ते जाणून घेऊयात.
देशभरात रिलीजपूर्वी प्रचंड चर्चा असूनही, यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र आणि नकारात्मक रिव्ह्यू मिळाले. तरीही या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने १०१.१० कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आणि पहिल्या दिवसाच्या निम्मी कमाईही झाली नाही. दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन ३७.६५ कोटी रुपये होते. तर रिलीजच्या तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ होण्याऐवजी घट झाली आहे.
‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ने तिसऱ्या दिवशी २६.६० कोटींचे कलेक्शन केले. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी हिंदीत सर्वाधिक १९.१५ कोटी रुपये कमावले. कन्नडमध्ये ५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. मल्याळममध्ये ०.२० कोटी, तमिळमध्ये ०.७५ कोटी आणि तेलुगूमध्ये १.५० कोटींची कमाई केली. टॉक्सिकची ३ दिवसांची भारतातील एकूण निव्वळ कमाई १६५.३५ कोटी रुपये झाली आहे. ३ दिवसांतील भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन १९७.७० कोटी रुपये झाले आहे. टॉक्सिकने तिसऱ्या दिवशी परदेशात ४ कोटी कमावले. त्यामुळे परदेशातील एकूण कलेक्शन २३.७५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाने जगभरात ३ दिवसांत २२१.४५ कोटी रुपये कमावले आहेत.
‘टॉक्सिक’ने हिंदी व्हर्जनमध्ये केला मोठा रेकॉर्ड
‘टॉक्सिक’ने ३ दिवसांत हिंदी व्हर्जनमध्ये सर्वाधिक कमाई करत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तो यंदा सर्वाधिक कमाई करणारा आठवा चित्रपट ठरला आहे. त्याने ‘मैं वापस आऊंगा’ आणि शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे.
२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० हिंदी चित्रपट-
धुरंधर २ – ११८६.३२ कोटी
बॉर्डर २ – ३६२.७६ कोटी
भूत बंगला – १९९.२३ कोटी
धमाल ४ – १७७.९२ कोटी
आवारापन २ – १४९.४८ कोटी
वेलकम टू द जंगल – १३७.९३ कोटी
कॉकटेल २ – १०४.५३ कोटी
टॉक्सिक – ७९.४ कोटी
ओ रोमियो – ८३.३५ कोटी
मैं वापस आऊंगा – ६५.१५ कोटी
दरम्यान, गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ मध्ये यश, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत, अक्षय ओबेरॉय, सुदेव नायर हे कलाकार आहेत.
