दाक्षिणात्य चित्रपटात मुख्य कलाकाराच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने कथा रचल्या जातात. त्यातही चित्रपटाचा सगळ्याच अर्थाने कर्ताकरविता तो कलाकार असेल तर कथाही त्याचीच आणि कौतुकही त्याच्याच वाट्याला येईल असा सगळा साज चित्रपटात असतो. ‘टॉक्सिक : द फेअरी टेल ऑफ ग्रोन अप्स’ या लांबलचक नावाने आलेला चित्रपटही असाच ‘यश’मय आहे. मुळात, या चित्रपटाची ‘कथा’ दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांची आहे, त्यांचंच दिग्दर्शनही आहे त्यामुळे पुरुषांच्या या टोळीयुध्दात चांगल्या स्त्री पात्रांची रेलचेलही पाहायला मिळते. पण, कथेचा करविताही यशच आहे, त्याने त्याच्यासाठी त्याच्या पध्दतीने कथा लिहिली आहे. त्यामुळे एक रंजक कथाकल्पना असलेल्या चित्रपटात ॲक्शन आणि हिरोच्या नावाखाली घातलेला घोळ आणि चित्रपटाचा वेळ सगळंच ‘अर्थहीन’ भासे मज हा कलह पडद्यावरचा असा अनुभव ठरतो.

‘टॉक्सिक : द फेअरी टेल ऑफ ग्रोन अप्स’ हे पडद्यावर त्याचा मतितार्थ समजावण्याचा प्रयत्न करत येणारं शीर्षक आणि चित्रपटाची कथा यातला संबंध हाही वेगळाच जांगडगुत्ता आहे. १९४७ साली भारताच्या दृष्टीने घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि अनेकांच्या काळजात रुतून बसलेलं फाळणी नामक दाहक वास्तव हा सगळा इतिहास एका बाजूला सारून हा चित्रपट तेव्हाच्या गोव्यात पोहोचतो. तिथे अजूनही पोर्तुगीजांचं वास्तव्य आहे. उच्चभ्रू लोकांचे क्लब्स आहेत, तिथे बाई, बाटली आणि नशा हाच धिंगाणा चालतो. आता हे चित्रपटाचं वेगळेपण असू शकतं. तर गोव्यात पोर्तुगीजांच्या आशिर्वादाने अंमली पदार्थ आणि त्या बळावर उभं राहिलेलं गुंडांचं साम्राज्य राजरोस पोसलं जातं आहे. हे साम्राज्य आपल्या कवेत घ्यायचं तर मग त्याचा म्होरक्या आपल्या बाजूने हवा. मग नाही म्हटलं तरी ‘गॉडफादर’ सदृश अनेक पाश्चिमात्य टोळीपटांमध्ये जो सत्तासंघर्ष आहे, तसाच भाग आपल्याला पाहायला मिळतो. हा नवा संघर्ष करणारे दोघं बहीणभाऊ आहेत राया आणि गंगा. हे दोघं रक्तरंजित खेळ खेळतायेत, ते मनापासून नाही. मग त्यांचा अतिशय दुर्दैवी, क्रूर असा भूतकाळ आहे. त्याच्याच खाणाखुणा मनावर घेऊन वावरणारा ‘राया’ हा अतिशय बेफिकीर, खेळात बंदूक चालवावी तसा हत्यार उचलत मुडदे पाडणारा, मुर्दाड मनाचा, प्रचंड भोगवादी माणूस. गंगानेच आजवर त्याचं रक्षण केलं आहे, त्यामुळे तिचा शब्द म्हणजे परवली मानणारा नायक वरून कितीही दुष्ट वाटत असला तरी छे… आतून तो तसा मुळीच नाही. तर सत्तेचा खेळ अर्थात म्होरक्याच्या मुलीशी लग्न करून जिंकणार… तोच त्याच्या आय़ुष्यात नादिया नामक तरुणीचा प्रवेश होतो. इथे मात्र त्याचं काठिण्य गळून पडतं, तो खरंच तिच्या प्रेमात पडतो, पण मग पुन्हा नियती आपले डाव टाकते.

एका क्षणात सगळं गमावून बसलेला राया फक्त आपला राग आणि त्या बळावर मिळवलेली सत्ता, नशा तेवढी वाढवत जगत राहतो. १९४७ ते पुढची वीस वर्ष असा कथेचा परीघ आहे. त्या काळात राया गोवा पार करून मकाऊपर्यंत आपली दहशत वाढवतो, कटू इतिहास गिळून गोव्यात परततो आणि पुन्हा कुणीतरी खरं प्रेम घेऊन त्याच्यापर्य़ंत पोहोचतं. मग एक वेगळाच कथाध्याय सुरू होतो, जो बापलेकातील संघर्षाचा आहे. आणि खरं म्हटलं तर हे नाट्यमय वळण थोडं रंजक आहे. नवं नसलं तरी आधीच्या त्याच त्याच टोळीयुध्द नाट्यापेक्षा वेगळं आहे. ते पाहताना मन प्रसन्न होतं असं नाही, उलट आत्तापर्यंत एकच विष ओकत होता, नंतरची दुहेरी मात्रा पोटात कळ उमटवतेच. असो, नंतर एक आणखी धक्कातंत्र वापरलं गेलं आहे जे काही प्रमाणात आहे… या जगात तर्काला थोडी का होईना जागा आहे, असा क्षणिक दिलासा देणारं आहे. तर कथेचा पैसच इतका मोठा आणि गुंतागुंतीचा करून टाकला आहे की कितीही वेगाने गोष्ट पुढे सरकली तरी बंदूका आणि गोळ्यांचा दणदणाट, रक्ताच्या चिळकांड्या… हे पचवत पचवत प्रेक्षक तिथल्या तिथे गोल फिरत राहतात. यशला बोलायचं काम अगदीच मोजकं आहे. स्टाईलमध्ये राहणं, वावरणं, मारणं, मध्येच कपडे उतरवणं, समोरच्या नायिकेला आव्हान देणं हे असं त्याचं काम आखीव रेखीव पध्दतीने डिझाईन केलं गेलं आहे. या चित्रपटाचा बर्‍यापैकी जमून आलेला भाग हा अर्थात कियारा अडवाणीची नादिया आणि राया यांच्यातली प्रेमकथा. कियारा अडवाणीची नादिया दिसायलाही अत्यंत सुरेख, नाजूक आहे आणि तितकीच जिद्दी, हळवी, समरसून जगणारी. ट्रेलर पाहिल्यानंतर खरंतर तिने ही भूमिका का केली असेल? असा प्रश्न पडला होता. मात्र, तिची नादिया उत्तम जमून आली आहे. या चित्रपटातली स्त्री पात्रं उल्लेखनीय आहेत. नयनताराने साकारलेली गंगा, तारा सुतारियाची रिबेका आणि रुक्मिणी वसंतची मेलिसा तिन्ही व्यक्तिरेखा चांगल्या आहेत. मात्र, विशेष लक्ष वेधून घेतात त्या नादिया आणि हुमा कुरेशीने साकारलेली एलिझाबेथ. अर्थात, ही पात्रं कितीही छान असली तरी ती यशच्या रायामुळे झाकोळली गेली आहेत.

स्थळकाळाचं सुटणारं भान आणि पूर्ण व्हीएफएक्सच्या मदतीने उभं केलेलं आणि सतत नाटकाच्या सेटवर आहोत असं वाटायला लावणारं गोव्याचं चित्रण हा आणखी त्रास देणारा भाग. कधी गोवा… कधी बर्फाळ प्रदेश… नेमकं काय सुरू आहे कळत नाही. ॲक्शनदृश्ये ही फार वाखाणण्याजोगी आहेत, हाही भाग नाही. संपूर्ण चित्रपट एका पध्दतीने स्टाईल करून त्याची मांडणी झाली आहे. पण, त्यामुळेच त्यात सतत कृत्रिमपणा जाणवत राहतो. यशला अभिनय करायची संधी संपूर्ण चित्रपटात नाही. उत्तरार्धात काही भाग तो लक्ष वेधून घेतो, जिथे तो तरुण वयात वावरताना दिसतो. त्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येते. पण, माणूस ‘टॉक्सिक’ आहे म्हणायचं आणि खटाटोप मात्र तो मुळात तसा नाही हे दाखवायचा… या विरोधाभासातच झुलत राहिलेला हा चित्रपट म्हणूनच काही मोजक्या ठिकाणी रंजक वाटला तरी तो ‘अर्थहीन’च ठरतो.
दिग्दर्शक – गीतू मोहनदास
कलाकार – यश, नयनतारा, तारा सुतारिया, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय, रुक्मिणी वसंत, संजिदा शेख