कन्नड इंडस्ट्रीचा सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान यशने ‘आप की अदालत’मध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. यश स्टार झाल्यानंतर आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम झाल्यानंतरही त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करत राहिले. मुलगा ऑडीमधून फिरतो आणि वडील बस चालवतात, या लोकांच्या टोमण्यांचा यशला त्रास व्हायचा; मात्र वडिलांसाठी ते काम पैशांपेक्षा त्यांची खरी ओळख होतं.

‘आज यशकडे पैसा, घर आणि सर्व काही असतानाही वडिलांनी बस चालवण्याचं काम का सुरू ठेवलं?’ असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. उत्तर देत यश म्हणाला, “हो सर, त्यांनी खूप काळापर्यंत हे काम केलं. मला वाटतं जेव्हा माझ्या बहिणीला मुलं झाली, तेव्हा त्यांनी यावर विचार करायला सुरुवात केली. मी त्यांना नेहमी याबाबत विचारायचो, पण ते म्हणायचे, ‘तू तुझं काम कर, मी माझं करेन.'”

लोकांच्या बोलण्याचा त्रास व्हायचा – यश

मुलगा ऑडीमधून फिरतो आणि वडील मात्र अजूनही बस चालवतात, या लोकांच्या बोलण्याचा त्रास व्हायचा, असं यशने सांगितलं. “या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, म्हणून नंतर मी त्यांना कारने पाठवायला सुरुवात केली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ड्रायव्हिंग सोडू नका.” यशला वाटत होतं की त्याच्या वडिलांनी त्यांचं काम चालू ठेवावं, पण बसपर्यंत जाण्यासाठी त्यांना महागड्या कारची गरज नव्हती. यशच्या मते, त्याच्या वडिलांना असा दिखावा अजिबात आवडत नव्हता.

यश म्हणाला, “मी त्यांना सांगायचो की माझ्यासाठी हे काम सोडू नका. मी इतकं कमवत असतानाही तुम्ही हे काम करताय, पण आता त्याची गरज नाही. खरं तर मला या गोष्टीचा कधीच कमीपणा वाटला नाही. मी फक्त एवढाच विचार करायचो की आता मी कमवतोय, तर तुम्ही आरामात आयुष्य जगा.” त्यावर त्याचे वडील सांगायचे की ते पैशासाठी काम करत नसून, त्यांना त्यांचं काम आवडतं आणि तीच त्यांची खरी ओळख आहे.

यशने एका प्रसंगाची आठवण सांगितली. जेव्हा तो मोठ्या सरकारी कार्यक्रमांना जायचा, जिथे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असायचे, तिथेही त्याचे वडील अत्यंत साधेपणाने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये उभे राहायचे. एकीकडे यशला खास पाहुणा म्हणून आदर मिळायचा, तर दुसरीकडे त्याचे वडील त्यांच्या नोकरीत आणि सहकाऱ्यांबरोबर तितक्याच साधेपणाने वावरायचे. त्याच्या वडिलांनी कधीही मुलाच्या प्रसिद्धीला स्वतःची ओळख बनू दिलं नाही आणि स्वतःच्या कष्टाला प्राधान्य दिलं.

यशचा ‘टॉक्सिक’ २६ ऑगस्टला रिलीज होणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात यशबरोबर नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटानंतर यश नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या भव्य चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.