सोमवारी पहाटे अभिनेत्री त्रिशा कृष्णनने तिरुपती देवस्थानला भेट देऊन श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. त्याचं निमित्त म्हणजे आज ४ मे रोजी तिचा वाढदिवस आहे. त्रिशा कृष्णन दरवर्षी अशाच प्रकारे तिरुपतीला दर्शन घेऊन तिचा वाढदिवस साजरा करते. यावेळी मात्र, चाहत्यांनी याचे कनेक्शन तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांशी जोडले आहे. योगायोगाने आजच मतमोजणी सुरू असून, तिचा सहकलाकार आणि जवळचा मित्र थलापती विजय याचा नवीन राजकीय पक्ष ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) सध्या आघाडीवर आहे.
ANI या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्रिशा पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सलवार सूटमध्ये मंदिरात प्रवेश करताना दिसली. यावेळी तिच्याबरोबर तिचे काही सहकारी देखील होते. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून ती हसत म्हणाली, “तुम्ही लोक झोपत नाही की काय?” दर्शन झाल्यानंतर त्रिशा लाल रंगाची ओढणी परिधान करून बाहेर पडली. कडक सुरक्षा व्यवस्थेत तिने पुन्हा एकदा फोटोग्राफर्सना पोझ दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले.
विजयच्या TVK पक्षाची दमदार कामगिरी
सोशल मीडियावरील या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी असा दावा केला आहे की, त्रिशाने फक्त स्वतःच्या वाढदिवसासाठीच नाही, तर थलपती विजयच्या विजयासाठीही प्रार्थना केली असावी. या वर्षी विजयने तामिळनाडूतील प्रस्थापित दोन-पक्ष डीएमके आणि AIADMK ला मोठा धक्का दिला आहे. अवघा दीड वर्षांचा हा पक्ष सत्ताधारी ‘डीएमके’ आणि ‘एआयएडीएमके’ या दोन्ही पक्षांच्या पुढे असून आघाडीवर आहे.
कलाकारांनी मुख्यमंत्री बनण्याचा तामिळनाडूचा इतिहास जुना आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एम. जी. रामचंद्रन (AIADMK संस्थापक), जे. जयललिता आणि व्ही. एन. जानकी रामचंद्रन. यावेळी जर खरोखरच विजयने ही निवडणूक जिंकली आणि तो मुख्यमंत्री झाला, तर एमजीआर यांच्यानंतरच्या गेल्या ५० वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल की, एखादा अभिनेता स्वतःचा नवीन पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला.
त्रिशा आणि विजयचं नातं
त्रिशा आणि विजय यांनी ‘घिल्ली’ (२००४), ‘तिरुपाची’ (२००५), ‘आधी’ (२००६), ‘कुरुवी’ (२००८) आणि ‘लिओ’ (२०२३) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वी विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने पतीचे एका अभिनेत्रीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत विभक्त होत असल्याची घोषणा केली, तेव्हा त्यांचं नातं चर्चेत आलं. या घोषणेनंतर काही दिवसांतच विजय आणि त्रिशा एका लग्न समारंभात एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या.
