Trisha Krishnan reacting to Thalapathy Vijay rumors outside theatre : तमिळ चित्रपट ‘करुप्पू’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट आधी १४ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता पण, तसं न होतं १५ मे रोजी एक दिवस उशीराने हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आर.जे बालाजी तसेच चित्रपटातील अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यासाठी हा क्षण खास ठरला. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या शोसाठी त्रिशा थिएटरमध्ये पोहोचली होती. शो संपल्यानंतर ती बाहेर येताच चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली. यावेळी काही चाहत्यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल तिला प्रश्न विचारले. विजय आणि त्रिशाच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये त्रिशा तिच्या कारमधून जाताना दिसत आहे. यावेळी चाहत्यांनी तिच्या गाडीभोवती गर्दी केली होती. अनेक जण तिच्याबरोबर फोटो काढत होते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.

चाहत्याने त्रिशाला नेमकं काय विचारलं?

याचदरम्यान एका चाहत्याने हसत म्हटलं, “थलपतीला सांगा मी त्यांची विचारपूस केली.” हे ऐकताच त्रिशा हसली आणि लाजत “कंडिपा” म्हणजेच “नक्की” असं उत्तर दिलं. त्यानंतर ती फोनकडे पाहत स्मितहास्य करताना दिसली. पुढे चाहत्यांनी तिचं नाव घेताच तिने हात हलवत त्यांना प्रतिसाद दिला.

गेल्या रविवारी त्रिशा तिची आई उमा कृष्णन यांच्याबरोबर विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, एका खास क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. विजय तमिळनाडूबाबतच्या आपल्या योजना लोकांसमोर मांडत असताना त्रिशा भावुक झालेली दिसली. लोक टाळ्या वाजवत असताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर हसूही दिसत होतं. याशिवाय आणखी एक फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला, ज्यामध्ये त्रिशा विजय यांच्या आई शोभा यांना प्रेमाने मिठी मारताना दिसली.

त्रिशाचा २०१५ मध्ये उद्योगपती वरुण मणियनसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, त्यांचा साखरपुडा मोडला. दुसरीकडे, विजय यांनी १९९९ मध्ये संगीता सोर्नालिंगम यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुलं आहेत. अलीकडेच संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, विजय यांचे एका अभिनेत्रीशी संबंध असल्याचा आरोप केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा इतिहास रचला.