तमिळ सुपरस्टार थलपती विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. विजयचं एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. अशातच विजयने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर एका रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर संगीताने केलेला आरोप खरा आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
विजय व त्रिशाला एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. याचदरम्यान त्रिशा कृष्णनचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती विजयला “माझे घर” म्हणताना ऐकू येते. व्हायरल व्हिडीओमध्ये त्रिशा म्हणते, “घर म्हणजे एखादी जागा नसते, तर ती एक व्यक्ती असते आणि माझ्यासाठी विजय ती व्यक्ती आहे. तोच माझ्यासाठी शांतता, प्रेम आणि आदर आहे.”
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स ही त्रिशाने विजयबरोबरच्या प्रेमाची कबुली दिल्याचं म्हणत आहेत. तर काहींच्या मते त्रिशाने मैत्रीसाठी हे वक्तव्य केलं आहे. अनेकांनी त्रिशाच्या या विधानाला चुकीचं म्हटलं आहे.
पाहा त्रिशाचा व्हिडीओ
विजय व त्रिशाचा व्हायरल व्हिडीओ
विजय व त्रिशाने चेन्नईत निर्माते कलपथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यामध्ये विजय आणि त्रिशा कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आलेले दिसतात. त्यानंतर ते दोघेही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर जाताना दिसतात. मुख्य म्हणजे दोघांनीही सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं.
व्हिडीओमध्ये विजयच्या हातात फुलांचा गुच्छ दिसत आहे, तर त्रिशा तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांशी हसून गप्पा मारताना, त्यांना मिठी मारताना, भेटताना दिसत आहे. त्रिशा व विजयने नवविवाहित जोडप्याबरोबर फोटोही काढले आणि दोघेही साधारणपणे एकत्रच तिथून बाहेर पडले.
विजयने दिली प्रतिक्रिया
विजयची पत्नी संगीताने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे व फसवणुकीचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर विजय व त्रिशा एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबद्दल मोठी चर्चा होत आहे. एका कार्यक्रमात विजय म्हणाला, “अलीकडे अनेक वाद सुरू आहेत. मला दिसतंय की तुमच्यापैकी अनेक जण मला पाठिंबा देत आहेत आणि या चर्चांमुळे तुम्हाला त्रास होतोय. तुम्हाला त्रास होताना पाहून मलाही दुःख होतंय. मी हे सगळं सांभाळून घेईन. आपण फक्त लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करूया. ते वाद आता महत्त्वाचे नाहीत, त्यामुळे कृपया त्या गोष्टींमुळे त्रास करून घेऊ नका.”
