तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली. त्यानंतर ४ दिवसांनी पहिल्यांदाच अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने इन्स्टाग्रामवर काही क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्रिशाच्या या पोस्ट्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण विजय व संगीता यांच्या वैवाहिक आयुष्यात त्रिशामुळेच वादळ आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्रिशा किंवा विजय या दोघांनीही या अफवांवर सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

त्रिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये “या वयात हे नाटक करणं खूपच लाजिरवाणं आहे… जा, थोडे पैसे कमवा आणि शांती मिळवा,” असं लिहिलंय. तिने या पोस्टबरोबर एक इमोजी वापरला होता, पण ती नेमकी कोणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलत आहे हे तिने स्पष्ट केलं नाही.

Trisha shares cryptic posts after Vijay wife withdraws divorce plea
त्रिशा कृष्णनने केलेल्या पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

तिने ‘इव्हिल आय’ म्हणजेच नजरचा इमोजी वापरून री-शेअर केलेल्या दुसऱ्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये “तुम्ही ज्या आयुष्यासाठी कधीकाळी प्रार्थना केली होती, तेच आयुष्य आज भरभरून जगायला मिळणं हे किती मोठं प्रिव्हिलेज आहे,” असं लिहिलंय.

विजय आणि संगीता यांच्या लग्नाबाबत पुन्हा सुरू झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या पोस्ट्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्रिशाने साजरा केला आजीचा वाढदिवस

त्रिशाने तिच्या आजीच्या ९८ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिची आई आणि कुटुंबातील इतर सदस्य पाहायला मिळतात. सर्वांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि फोटो काढले.

विजय यांची पत्नी संगीताने मागे घेतली घटस्फोटाची याचिका

संगीता यांनी चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यानंतर चार दिवसांनी त्रिशाने केलेल्या या पोस्टची चर्चा होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, संगीता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहिल्या. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांना ही याचिका मागे घ्यायची आहे. विजय यांच्या वकिलांनी ही याचिका मागे घेण्याबद्दल कोणताही आक्षेप नोंदवला नाही. त्यानंतर न्यायालयाने संगीता यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आणि गरज पडल्यास नवीन याचिकेद्वारे पुन्हा न्यायालयात येण्याचा पर्याय खुला ठेवला. मात्र, संगीता यांनी ही याचिका मागे घेण्याचा निर्णय का घेतला, याचं स्पष्टीकरण न्यायालयाला दिलं नाही.

त्रिशा व विजय यांच्या अफेअरच्या चर्चा

विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाची याचिका दाखल करताना विजय यांचे एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचे आरोप केले होते. तिच्यामुळे वैवाहिक नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं होतं. संगीता यांनी थेट नाव घेतले नसलं, तरी त्रिशाच्या आधीच्या पोस्ट आणि तिचं विजय यांच्याबरोबर ट्विनिंग करून चेन्नईतील एका रिसेप्शनला जाणं, यामुळे या प्रकरणात तिचंच नाव आलं. त्यानंतर विजय तमिळनाडूच्या निवडणुका जिंकल्यावर त्रिशा थेट त्यांच्या घरी गेली होती, तसेच त्यांच्या शपथग्रहण समारंभालाही उपस्थित होती. त्यानंतर तिने विजय यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटोही पोस्ट केले होते.