Trisha Krishnan first Post after viral video with Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणी थलपती विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या एका व्हायरल व्हिडीओनंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. विजयच्या पत्नीने त्याचं अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप करत घटस्फोट मागितला आहे. अशातच त्रिशा व विजय यांनी एकत्र ट्विनिंग करत रिसेप्शनला हजेरी लावली. त्यानंतर त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर केलेल्या पहिल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
निर्माते कलपथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला तमिळ स्टार विजय आणि त्रिशा यांनी एकत्र हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमने अलीकडेच त्यांचं २७ वर्षांचं वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला. तिने चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. याचदरम्यान त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, जी चांगलीच व्हायरल होत आहे.
२७ फेब्रुवारी रोजी संगीता सोर्निलिंगमने विजयपासून घटस्फोट मागितल्याच बातमी समोर आली. त्यानंतर विजय आणि त्रिशा कृष्णन पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्रिशाने तिचे सोनेरी साडीतील दोन फोटो शेअर करत आभार मानले आहेत. “नेहमी माझी हक्काची माणसं असल्याबद्दल धन्यवाद!” असं त्रिशाने लिहिलंय.
पाहा त्रिशाची पोस्ट
त्रिशा आणि विजय ही तमिळ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी आहे. त्यांनी २००४ मध्ये घिल्ली चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते तिरुपाची, आथी आणि कुरुवीमध्ये दिसले. त्यानंतर, त्यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं नव्हतं. पण २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकेश कनागराजच्या लियोसाठी पुन्हा एकत्र आले. तेव्हापासूनच त्रिशा व विजय नात्यात असल्याच्या चर्चा होत आहेत.
दरम्यान, त्रिशा व विजय यांच्यात ९ वर्षांचे अंतर आहे. त्रिशा विजयपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. त्रिशामुळे विजयचा संसार मोडल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. २७ वर्षांपासून विजय संगीताबरोबर संसार करत होता. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पण त्रिशामुळे आता त्यांचा संसार मोडला आहे, असं म्हटलं जातंय. अद्याप त्रिशा किंवा थलपती विजय यांनी याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
