Trisha Krishnan & CM Vijay Independence Day Event: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या हस्ते चेन्नईतील ‘फोर्ट सेंट जॉर्ज’ येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन तिच्या आईसह थेट मुख्यमंत्री विजय यांच्या आई-वडिलांच्या शेजारी पहिल्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री विजय जीपमधून जात असताना त्रिशाने त्यांना मारलेला सॅल्यूट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यानंतर, हा त्रिशाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

एका व्हिडीओमध्ये, मुख्यमंत्री विजय जीपमधून जात असताना त्रिशा त्यांना सॅल्यूट करताना दिसली. या कार्यक्रमासाठी त्रिशाबरोबर तिची आई उमा कृष्णन देखील उपस्थित होत्या. त्रिशाने या प्रसंगी गोल्डन रंगाची साडी आणि केसात गजरा माळला होता.

पाहा त्रिशा कृष्णनचा व्हिडीओ

तमिळनाडू निवडणुकीच्या आधी आणि नंतर विजय आणि त्रिशा अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळेही दोघे प्रचंड चर्चेत राहिले होते.

त्रिशा कृष्णन व विजय यांचे चित्रपट

विजय आणि त्रिशा ही तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी आहे. त्यांनी ‘गिली’, ‘थिरुपाची’, ‘आथी’ आणि ‘कुरुवी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. २००८ नंतर ही जोडी २०२३ मध्ये आलेल्या ‘लिओ’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसली होती. आपल्या नात्याबद्दलच्या अफवांवर बोलताना विजय आणि त्रिशा आपण फक्त चांगले मित्र असल्याचं सांगतात.

विजय यांच्या पक्षाने तमिळनाडू निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्रिशा कृष्णन त्यांच्या घरी पोहोचली होती. इतकंच नाही तर मे महिन्यात पार पडलेल्या विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशा उपस्थित होती. त्याचबरोबर विजय यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी त्रिशा कायम उपस्थित असते.

दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी विजय यांची पत्नी संगीता यांनी चेंगुलपट्टू कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहत त्यांनी हे प्रकरण पुढे न्यायचं नसल्याचं स्पष्ट केलं. मग न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. संगीता यांनी आपल्या याचिकेत विजय यांच्यावर मानसिक छळ, दुर्लक्ष आणि एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप केला होता. निवडणुकांपूर्वी त्यांनी याचिका दाखल केल्याने बरीच चर्चा झाली होती, मात्र आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आहे.