Trisha Krishnan shares cryptic post on love amid relationship rumours with Thalapathy vijay : त्रिशा कृष्णन दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्रिशानं आतापर्यंत अनेक चित्रपटांत लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय. विजय व त्रिशा एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही अनेकांच्या चर्चेचा विषय झाले आहेत.
त्रिशा कृष्णन सोशल मीडियावर सक्रिय असते आणि त्यामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलच्या अपडेट्स ती शेअर करत असते. अशातच आता त्रिशानं एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिनं प्रेमासंदर्भात एक पोस्ट शेअर केल्यानं यावरुन वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर काही दिवसांपूर्वी थलपती विजयची पत्नी संगीता हिनं घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यावेळी तिनं विजयचे एका लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर विजय व त्रिशा यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं.
विजय त्यानंतर त्रिशाबरोबर एका लग्नातही स्पॉट झाला होता. सोशल मीडियावर दोघांचे त्या लग्नातील फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. विजयच्या पत्नीनं घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर विजयचे त्रिशाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या परंतु, त्यानं याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच आता त्रिशानं प्रेमासंदर्भातील एक पोस्ट शेअर केल्यानं ती पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
त्रिशा नेमकं काय म्हणाली?
त्रिशानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘प्रेम म्हणजे सर्वस्व नाही पण, प्रेमाशिवाय सगळंच निरर्थक आहे’. असं लिहिलेलं आहे. त्रिशाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं. तर अभिनेत्रीनं खऱ्या आयुष्यात अजून लग्न केलेलं नाहीये. त्रिशा आता जरी सिंगल असली तरी पूर्वी तिचा साखरपुडा झालेला आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार होती. परंतु, नवीन प्रवास सुरू होण्याआधीच तिनं त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नेमकं काय झालेलं आणि अभिनेत्रीनं साखरपुडा का मोडलेला याबद्दल तिनं एका मुलाखतीत सांगितलेलं. त्रिशा नेमकं काय म्हणालेली याबद्दल जाणून घेऊयात…
त्रिशाचा चेन्नईतील उद्योगपती वरुण मणियनशी साखरपुडा झालेला. पण, नंतर साखरपुडा मोडण्यात आला आणि त्रिशानं यामागचं कारणही सांगितलेलं. माध्यमांच्या वृत्तानुसार त्रिशानं याबद्दल एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अभिनेत्री मोडलेल्या साखरपुड्याबद्दल म्हणालेली, “ज्या व्यक्तीशी माझं लग्न होणार होतं, त्यानं मला अभिनय सोडायला सांगितलेला. चित्रपटात काम करणं थांबवण्यापेक्षा मी साखरपुडाच मोडला. मी फक्त तेव्हाच ब्रेक घेईन, जेव्हा मी गरोदर असेन. जर मला मुख्य भूमिकांसाठी विचारणा झाली नाही, तर मी माझ्या व्यक्तिरेखेला साजेशा इतर भूमिका करेन; पण फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची माझी इच्छा आहे.”
