Sanjay Dutt Daughter Trishala: बॉलीवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त याची थोरली मुलगी संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. ग्लॅमरस जगापासून लांब असलेल्या त्रिशालाने नुकताच तिच्या करिअर निवडीबाबत एक खुलासा केला. तिने सांगितलं की, लहानपणी तिला अभिनेत्री बनायची इच्छा होती, मात्र ती अभिनयाच्या आवडीमुळे नाही तर केवळ वडील संजय दत्त यांच्या जवळ राहता यावे यासाठी होती. आई रिचा शर्मा यांच्या निधनानंतर परदेशात वाढलेल्या त्रिशालाला वडिलांच्या प्रेमाची ओढ होती. आज त्रिशाला मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे नाव कमावत आहे. १९८८ मध्ये जन्मलेली त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. १९९६ मध्ये रिचा यांच्या निधनानंतर त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांकडे लहानाची मोठी झाली.
‘इन्साईड थॉट्स आऊट लाउड’ या पॉडकास्टमध्ये तिला विचारण्यात आलं की, तुला कधी बॉलीवूडमध्ये काम करावं वाटलं का? त्यावर ती म्हणाली, “लहान असताना मी याबद्दल विचार केला होता. पण मला अभिनेत्री बनायचं होतं कारण मला अभिनय आवडत होता, असं नाही तर मला फक्त माझ्या वडिलांच्या जवळ राहायचं होतं.”
संजय दत्तची प्रतिक्रिया काय होती?
त्रिशालाने याबद्दल वडील संजय दत्तबरोबर चर्चा केली. त्याच्या प्रतिक्रियेबद्दल त्याने सांगितलं. त्रिशाला म्हणाली, “त्यांनी आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. त्यांनी मला विचारलं, ‘ही खरंच तुझी आवड आहे का? तुला मनापासून या क्षेत्रात यावं वाटतं का?’ मी त्यांना सांगितलं की, ‘मला फक्त तुमच्याबरोबर जास्त वेळ घालवायचा आहे.’ त्यावर ते म्हणाले, ‘तुला नेमकी कशाची आवड आहे, त्याबद्दल आपण बोलू आणि त्या क्षेत्रात तू पुढे जा. तू अमुक एका व्यक्तीची मुलगी आहेस म्हणून तू थेट ए-लिस्ट अभिनेत्री बनशील किंवा तुला खूप ऑफर्स येतील, असं अजिबात नाही.'”
त्रिशालाने थेरपिस्ट (मानसोपचारतज्ज्ञ) होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “इतरांप्रमाणेच माझाही स्वतःचा संघर्ष आहे. मी थेरपिस्ट झाले जेणेकरून लोकांना हे सांगू शकेन की, आयुष्यात संघर्ष असणं यात काहीच गैर नाही. तुम्ही नेहमीच प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असण्याची गरज नाही आणि या प्रवासात तुम्ही एकटे नाहीत. तसेच बॉलीवूड कुटुंबातून असूनही, मी या चित्रपटसृष्टीतील कोणालाही मानसिक आरोग्याबद्दल जास्त बोलताना पाहिलं नाही. मला लोकांशी कनेक्ट व्हायचं होतं, त्यांना पटवून द्यायचं होतं की, तुम्ही चित्रपटसृष्टीत असाल किंवा नसाल तरी आयुष्यात सगळं चांगलं नसतं. आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत.”
वडिलांबरोबर कधीच राहिले नाही – त्रिशाला
गेल्या काही वर्षांत त्रिशाला सोशल मीडियाद्वारे तिच्या वडिलांबरोबरच्या नात्यावर अनेकदा व्यक्त झालीये. तिचा सांभाळ न्यूयॉर्कमध्ये तिच्या आजी-आजोबांनी केला. ती भारतातही खूप कमी वेळा येते. काही वर्षांपूर्वी एका इन्स्टाग्राम युजरने तिला विचारलं होतं की, “आई-वडिलांशिवाय राहणं कसं वाटतं?” त्यावर ती म्हणालेली, “ठीक आहे. मुळात मी कधीच त्यांच्यासोबत राहिले नाही. राहिले होते, पण तेव्हा मी इतकी लहान होते की मला त्याबद्दल काहीच आठवत नाही, त्यामुळे त्यांच्याशिवाय राहणं कसं वाटतं, हे मी सांगू शकत नाही.”
त्रिशाला दत्त ही संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी, अभिनेत्री रिचा शर्मा यांची मुलगी आहे. रिचा शर्माचे १९९६ मध्ये ब्रेन कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर संजय दत्तने १९९८ मध्ये रिया पिल्लई यांच्याशी लग्न केलं, पण २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००८ पासून तो मान्यता दत्तबरोबर आहे. २०१० मध्ये त्यांना शाहरान आणि इक्रा ही जुळी मुलं झाली.
