अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर सोमवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर त्यांच्या पार्थिवाचे फोटो व्हायरल झाले. दुबईच्या हॉस्पीटलमधील श्रीदेवी यांचा फोटो अशा कॅप्शनसह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तो श्रीदेवी यांचा नसून एका दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेला फोटो हा फेक असल्याचे समजते आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांचे दुबईत अकस्मात निधन झाले. श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमधील पाण्यात बुडून झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीतून स्पष्ट झाले. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर दुबई पोलिसांनी हे प्रकरण दुबई सार्वजनिक फिर्याद विभागाकडे सोपवले. या विभागाचा अहवालही लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे. कायदेशीर पद्धतींमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत होता.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे दिसून येते आहे. दुबई पोलिसांनी काही वेळापूर्वीच श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात घेऊन जाण्यासंबधीचे पत्र भारतीय दुतावास आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. तसेच दुबई पोलिसांकडून पार्थिव भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे समजते आहे.