‘आपण शिव्या का देतो?’ एका बारा वर्षांच्या मुलाला पडलेला प्रश्न. एका वर्गासाठी शिव्या देणं हे असभ्य, असंस्कृतपणाचं लक्षण आहे, तर दुसरीकडे अनेकांच्या रोजच्या जगण्यातली ती भाषा आहे. या दोघांमधलं खरं-खोटं काय? कधीतरी पडलेले हे प्रश्न, त्यातून सापडलेलं कथाबीज आणि अनुभवाच्या शिदोरीतून जमा झालेल्या विचारांचं कोंदण या सगळ्याचा अचूक मेळ साधत दिग्दर्शक सुजय डहाके यांनी ‘तुझ्या आयला’ हा नितांतसुंदर चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. तुमच्याकडे सांगण्यासारखी उत्तम गोष्ट असेल, तर कुठलाही अनुभवी कलाकार नसताना, कुठल्याही भव्यदिव्यपणाचा, व्हीएफएक्सचा सोस न बाळगताही एक सुंदर दृश्यानुभूती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देता येते, हे सुजय डहाके यांनी ‘तुझ्या आयला’च्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून जगण्याची इतकी सुंदर गोष्ट सांगणारा हा चित्रपट सेन्सॉर कृपेने प्रौढ प्रमाणपत्र मिळवता झाला असल्याने मुलांनाच पाहता येणार नाही, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.
‘तुझ्या आयला’ या चित्रपटाची गोष्ट मोठी नाही, इथून सुरू झाली… तिथे संपली हा कल्पनाविलासही इथे उपयोगाचा नाही. पुण्यात जन्मलेला अविनाश अरुण देशपांडे हा सातवी-आठवीत शिकणारा मुलगा. वडिलांची सरकारी नोकरी असल्याने त्यांच्या बदलीचे निमित्त होऊन गावच्या शाळेत दाखल झाला आहे. पुण्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या अविनाशसाठी गावचं हे जगच वेगळं आहे. पण, गावात आल्यानंतर त्याला आपण कुठे येऊन पडलो आहोत? आपलं भविष्य काय? असली चिंता सतावत नाही.
अविनाशच्या या गोष्टीत त्याची आजी त्याच्या आठवणीतून आपल्याला दिसत राहते. आजीने अवीला सांगितलं आहे, ‘एक गाव जेवढं शिकवू शकतं ना तेवढं मोठं शहर नाही शिकवत…’. आजीची गोष्ट मनात साठवून खुल्या दिलाने गावात आलेल्या अवीला जगण्यातला विरोधाभास इथे ठायी ठायी जाणवतो. एकच शिक्षक असलेल्या गावच्या शाळेत शिक्षण हे नावालाच. मुलं रामभरोसे शिक्षण घेतात, बाकी शाळेबाहरेची परिस्थिती त्यांना खरं शिक्षण देत आहे. इथे अवीला ‘तुझ्या आयला’ या खेळाची ओळख होते. मधल्या सुट्टीत शाळेबाहेर एका झाडाखाली हा खेळ खेळला जातो. शिव्यांच्या आधारे खेळला जाणारा हा खेळ. शिव्या देणं हे वाईटच… त्यामुळे वरवर पाहता हा निरर्थक खेळ. पण, ज्याच्या सुपीक डोक्यातून हा खेळ जन्माला आला आहे त्या खंड्याला अजून कोणीही या खेळात हरवू शकलेलं नाही. मग शहरातून गावात आलेला हा ‘देशपांडे’ खंड्याबरोबर हा खेळ खेळून त्याला हरवायचं आव्हान स्वीकारतो. आणि या खेळातून तथाकथित सुशिक्षित, शहरी लोकांच्या जगण्यातला, विचारातला विरोधाभास, खंड्यासारख्या निरागस, हुशार मुलांचं परिस्थितीमुळे होणारं अध:पतन असं काय काय अवीबरोबरच आपल्यालाही आकळत जातं नव्याने…
‘शिवी नाही… खेळ आहे हा’ हे घोषवाक्य लेखक – दिग्दर्शक सुजय डहाके यांनी चित्रपटाच्या शीर्षकाबरोबरच दिलेलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या विषयाबाबत त्यांनी एकप्रकारे स्पष्टताही दिली आहे आणि उत्कंठाही वाढवली आहे. या चित्रपटाची ताकद त्याच्या विषयात आणि मांडणीत आहे. लेखक-दिग्दर्शक एकच असल्यामुळे चित्रपटात पहिल्या दृश्यचौकटीपासून ते शेवटपर्यंत असलेली स्पष्टता पाहणाऱ्याला अधिक प्रभावित करते. नियाज मुजावर यांचं पटकथा लेखनही तितकंच उजवं आहे. आपण शिवी का देतो? शिवी हे एकप्रकारे आपला राग, नाराजी व्यक्त करण्याचं माध्यम कसं आहे, हे साध्यासहज संवादातून अवीला दत्ताकाका समजावून देतात. अवीचा प्रश्न इथेच थांबत नाही. मग शिव्या नेहमी आईवरूनच का दिल्या जातात? आईवरून दिलेली शिवी आपल्याला का त्रास देते? असे कित्येक प्रश्न तो विचारत राहतो. आणि दत्ताजीही त्याला कुठले आढेवेढे न घेता, त्याला त्यांच्या व्यावहारिक अनुभवातून आलेली प्रामाणिक उत्तरं देत राहतात. लहान मुलांना खरं-खोटं स्पष्ट कळतं, विरोधाभास लगेच लक्षात येतो. अवीच्या बाबतीतही ते होतं. गावातल्या या मुलांबरोबर राहशील तर असाच हिंसक होशील, हे आईचं म्हणणं आणि प्रत्यक्ष आई-बाबांच्या रोजच्या भांडणातून होणारी हिंसेची जाणीव, याचा ताळेबंद अवीच्या मनाने मांडलेला असतो. हे असे मोजके प्रसंग, शब्दबंबाळ नसलेले चपखल संवाद आणि त्यातून शिव्यांमागे लपलेल्या जगण्याचं वास्तव हे चित्रपटातूनच अनुभवावं असं आहे.
‘तुझ्या आयला’ हा केवळ कथेच्या बाबतीत नाही, तर एक संपूर्ण सर्वांगीण उत्तम दृश्यानुभव ठरला आहे. कोकणातलं सुंदर, टुमदार दिसणारं असं गाव चित्रपटात नाही. डोंगरातून जाणाऱ्या वाटावाटांमधून पळणारी एसटी आहे. तरीही मोकळं माळरान आहे, डोंगराच्या एका टोकाला असलेले पाले आहेत. रखरखीत वातावरण आहे, सुविधा नसलेली शाळा आहे आणि तरीही हे गाव, तिथली माणसं आपल्याला सुंदर भासतात. जणू गाव हेही त्या गोष्टीतलं एक पात्र असावं. विजय मिश्रा यांच्या कॅमेऱ्याने खूप सुंदर गोष्टी टिपल्या आहेत. ड्रोनच्या साहाय्याने घेतल्या जाणाऱ्या लाँग दृश्यांची रेलचेलही चित्रपटात नाही. एखादी सुंदर ओळ गुणगुणत आपण पुढे जावं, अशा लयीत साकेत कानेटकर यांनी दिलेलं बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला चित्रपटभर साथ करतं. मंदार चोळकर यांनी लिहिलेली गाणी, वरुण लिखाते यांचं संगीत आणि अभिनयाचा कुठलाही अनुभव नसलेल्या बालकलाकारांनी केलेलं उत्तम काम सगळ्याचा सुंदर मेळ साधत दिग्दर्शकाने ‘तुझ्या आयला’सारखा एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे.
दिग्दर्शक – सुजय डहाके
कलाकार – रोहिणी हट्टंगडी, सोहम बाबर, अभिजित थिटे, राजश्री देशपांडे, संभाजी भगत, प्रमोद पवार, जैद शेख, हृषिकेश वानखेडे, अभिषेक झेंडे, मल्हार दांडगे.
