प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांद्वारे विविधांगी विषय रसिकांसमोर सादर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी ‘तुझ्या आयला’ या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे महत्त्वपूर्ण गाणे सध्या प्रदर्शित झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत, लयबद्ध चाल आणि मनाला भिडणारे सूर यांचा संगम या गाण्यात जाणवतो. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘तुझ्या आयला’ या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेले हे गाणे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून उतरले आहे. संगीतकार वरुण लिखते यांनी या गाण्याला संगीतसाज चढवला आहे. झी म्युझिक अंतर्गत सादर करण्यात आलेल्या या गाण्यात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा ठाव यात घेण्यात आला आहे.
‘जिथं जिथं गेलास तू, उमटला तुझा ठसा…’ असा मुखडा असलेल्या या गाण्यात शालेय जीवनातील खेळ, धमाल, मजा, मस्ती, दंगा, भटकंती, भांडणे, हाणामाऱ्या, मैत्री, दुरावा, आपलेपणा यांची सरमिसळ पाहायला मिळते. या गाण्यातून ‘तुझ्या आयला’ या खेळाची झलकही पाहायला मिळते. पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर, मोहित अरोरा आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत.
या चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका असून २५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
