दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमाची गोष्ट सांगताना त्या त्या वेळचे सामाजिक संदर्भ धरून केलेली मांडणी अधिक सयुक्तिक ठरते. मयूरा प्रधान यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘तुला पाहता’ या चित्रपटात हे संदर्भ जाणवतात. त्याहीपेक्षा दोन पिढ्यांची विचारसरणी, प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कथेच्या ओघात लक्षात येत जातो हे विशेष. दोन प्रेमी युगुलं यात आहेत, त्यात अर्थात इला भाटे आणि सतीश पुळेकर या जुन्याजाणत्या कलाकारांची जोडी, त्यांच्यातलं नात्यांचं रसायन अनुभवणं ही या चित्रपटातली मोठी पर्वणी आहे. प्रेम तरल असतं, हळुवार असतंच आणि म्हणून त्याची मांडणीही त्याच अलवारपणे व्हायला हवी, त्यातला सहजपणा हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
साधारणपणे प्रेमकथा म्हटलं की त्यात गाणी, हळुवार प्रेमाचे खुलत जाणारे प्रसंग याची जोड असायलाच हवी. ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेमकथेची ती चौकट घट्ट धरून ठेवत असला तरी जगावेगळी गोष्ट सांगतो आहोत, हा अभिनिवेश त्यात नाही. त्यामुळे बर्यापैकी वास्तवतेची कास धरून हा चित्रपट आपली गोष्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतो. अरुंधती देशपांडे या ख्यातनाम लेखिका आहेत. नवनव्या पुस्तकांच्या लेखनात गर्क असलेल्या अरुंधती यांच्या भूतकाळातली प्रेमाची गोष्ट अर्धवट राहिली आहे. सत्यात न उतरलेलं हे पहिलं प्रेम, त्या प्रेमाच्या आठवणी त्यांनी मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. दुसरीकडे त्यांचा नातू सागर हा मानसीच्या प्रेमात पडला आहे. सागर हा गायक-संगीतकार आहे आणि मानसी बुद्धिबळपटू. हे दोघंही संगीत आणि बुद्धिबळ या दोन गोष्टींना एकत्र आणत मैफल सजवतात. दोघांचाही आपापला करिअरचा संघर्ष सुरू आहे. आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी लग्नाची मान्यता असणं गरजेचं नाही, हे सागरचं पक्कं मत आहे. त्यामुळे दोघंही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. सागरच्या आईला लिव्ह इन रिलेशनशीप ही संकल्पनाच मान्य नाही, तर मानसीच्या आईला आपल्या मुलीवर विश्वास आहे. पण, आई-वडिलांच्या निर्णयाची वाट पाहणारी ही पिढी नव्हे. ते दोघंही आपला निर्णय प्रत्यक्षात आणतात. आरु आजीचं प्रेमाचं विश्व आणि सागर-मानसी यांनी बनवलेलं त्यांचं घर या दोन्ही गोष्टी सुरळीत सुरू असतात. पण, एके दिवशी आरु आजींचं प्रेम कैक वर्षांनी त्यांच्यासमोर उभं ठाकतं. युद्धावर गेल्यानंतर कधीच न परतलेला त्यांचा हरी पुन्हा त्यांच्यासमोर उभा राहतो आणि मग आत्तापर्यंत घरच्यांपासून दडवून ठेवलेला हा भूतकाळ आणि त्यातलं रहस्य यांचा थेट परिणाम सागर-मानसीसह सगळ्या घरच्यांवर उमटू लागतो. या दोन्ही प्रेमांची गोष्ट सुफल संपूर्ण होते का? हे सांगताना प्रेमाबद्दलचे दोन पिढ्यांचे विचार, बदलत गेलेल्या संकल्पना आपल्यापर्यंत अचूकपणे पोहोचतात.
‘तुला पाहता’ या चित्रपटाची कथा खूप साधी आहे. त्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने वळण देण्याचं काम कथा-पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही आघाड्या सांभाळणार्या मयूरा प्रधान यांनी उत्तमपणे केलं आहे. लेखक-दिग्दर्शक एकच असला तर कागदावरची कथा आणि पडद्यावरचं चित्र यात जाणवणारी सुसूत्रता या चित्रपटातही जाणवते. चित्रपटात दोन प्रेमकथा असल्या तरी बव्हंशी चित्रपट हा अरुंधती देशपांडे या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. त्यामुळे अभिनेत्री इला भाटे यांनी बर्यापैकी हा चित्रपट एकटीने पेलून धरला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अरु आजींच्या तरुणपणीची भूमिका अभिनेत्री पल्लवी अजय हिने केली आहे. दोन वेण्या, साडी या वेशातली अरुंधती हे एक वेगळं रसायन आहे आणि ते दाखवण्यासाठी पल्लवीने एक विशिष्ट देहबोली, लकब स्वीकारली आहे, त्यामुळे ते पात्र उठून दिसतं. तीच अरुंधती आजच्या काळात इतके उन्हाळे-पावसाळे पाहिल्यानंतर खूप समजूतदार, प्रगल्भ बनली आहे. ती नातवांच्या निर्णयात ढवळाढवळ करत नाही. उलट, आत्ताची पिढी प्रेम, लग्न कुठल्याच बाबतीत आपलं म्हणणं ऐकून निर्णय घेणारी नाही, हे आपल्या मुलीला ती पटवून देते. भूतकाळ समोर आल्यानंतर एका टप्प्यावर एकटी पडल्यावरही अरुंधती त्रागा करत नाही, ती सगळ्याला धीराने सामोरी जाते. या सगळ्या छटा इला भाटे यांच्या अभिनयातून पाहणं हा सुरेख अनुभव आहे. सतीश पुळेकर यांना हरीच्या भूमिकेत अजून थोडा वाव मिळायला हवा होता.
नचिकेत लेले आणि मानसी पाटील या दोघांनी कुठलाही नवखेपणा जाणवू न देता आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. निशिगंधा वाड यांची निवड रश्मीच्या भूमिकेसाठी अचूक ठरली आहे. त्यांची भूमिका फारशी नसली तरी त्यांचा वावर प्रभावीपणे जाणवतो. या सगळ्या गोंधळात हरी आणि राघव या दोन्ही व्यक्तिरेखा लेखनातच फारशा प्रभावीपणे उमटलेल्या नाहीत. त्याही टोकदार असत्या तर कदाचित प्रेमाची ही गोष्ट अधिक गुंतागुंतीची आणि गहिरी झाली असती. रोहन-रोहन यांचे संगीत असलेली दोन्ही गाणी प्रेमकथेची लय सांभाळतात. आत्ताच्या काळात सगळ्याच बाबतीत अधीर असलेल्या तरुण पिढीचं प्रेम आणि संयम-समर्पणाची कास धरूनच वर्षानुवर्षं बहरत गेलेलं आधीच्या पिढीचं प्रेम या दोन्हींचा संगम साधणारी कथा ‘तुला पाहता’च्या निमित्ताने अनुभवायला मिळते.
दिग्दर्शिका – मयूरा प्रधान
कलाकार – इला भाटे, सतीश पुळेकर, पल्लवी अजय, निशिगंधा वाड, आनंद काळे, नचिकेत लेले, मानसी पाटील, स्वप्निल परजाणे, आकाश शिंदे.
