काही काही कथांचा जीव छोटा असतो, पण त्याचा परिणाम अधिक गहिरा होतो. थोडक्यात आणि उपदेशाचा कुठलाही डोस न पाजता नेमकी गोष्ट पोहोचवणार्या या कलाकृती मनोरंजनाच्या बाबतीतही हात आखडता घेत नसतील तर पाहताना अधिक मजा येते. अशापद्धतीचे निखळ मनोरंजक आशय असलेले चित्रपट बनवण्यात मल्याळम, कन्नड चित्रपटकर्मीं आघाडीवर आहेत. त्यामुळे अशाच एका कन्नड लेखक-दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असलेला विविध कोरगावकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपटही निखळ मनोरंजन करण्यात कुठेच कमी पडत नाही.
कोकणातल्या एका गावात ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची कथा घडते. भूत-पिशाच, करणी या सगळ्या संकल्पना फक्त कोकणात आणि कोकणी माणसातच रुजलेल्या आहेत, असं नाही. हे भूताचं भय अनेकांच्या मनात दबा धरून बसलेलं असतं. या भयापुढे माणसाची सदसद्विवेकबुद्धीही फिकी पडते. पण, समाजमानसातील या भयाने कुणाचं तरी काहीतरी चांगलं करता येईल, असा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात डोकावला आणि त्याने तो अमलात आणला तर जी काय छान गंमत अनुभवायला मिळेल, ती तुंबाडच्या मंजुळेची गोष्ट पाहताना येते.
छोट्याशा गावात कुठल्याही एका घरात काही घडलं की ते गावभर होतं. या सगळ्या गाव कारभारात काही मोजकीच माणसं अशी असतात जी लग्नापासून मयतापर्यंत सगळीकडे हजर असतात. सगळं बरोबर आहे ना, कोण कुठे काय चुकलेलं तर नाही, सगळ्यावर त्यांचं लक्ष असतं. या गावातही रवी अण्णासारखा शब्द आणि कृतीचं वजन असलेला अविवाहित तरुण सगळी सूत्रं हातात ठेवून आहे. रवी अण्णा सगळीकडे पुढे पुढे असतो म्हणून त्याचा राग करणारे गुरुजी आहेत. अण्णाचा सतीश नावाचा चेला आहे.
आणखी काही तरुण तुर्क म्हातारी अर्क प्रकारातली मंडळीही आहेत. तर या सगळ्या गोंधळात एका लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना गावातला तरुण केशवला भूताने झपाटल्याची बातमी गावात वार्यासारखी पसरते. केशवच्या आजीचं नुकतंच निधन झालं आहे आणि मंडळींचं सूतक संपायच्या आतच केशवला भूताने झपाटल्याने घरचेही हैराण होतात. गावच्या कोणत्याच मांत्रिकाला केशवच्या अंगातलं भूत बधत नाही म्हटल्यावर रवी अण्णा रोज दूरचित्रवाहिनीवर येणार्या लोकप्रिय करुणाकर गुरुजींना गावात घेऊन येतो.
आणि करुणाकर यांच्या प्रयत्नांतून केशवच्या अंगातलं भूत हे तुंबाड गावातल्या मंजुळेचं आहे, असा निष्कर्ष निघतो. मग या तुंबाडच्या मंजुळेचा शोध घेऊन तिला गावात आणणं आणि तिच्या माध्यमातून केशवच्या अंगातील भूत घालवणं यासाठी सारं गाव झपाटून कामाला लागतं. आता ही मंजूळा कोण? तिच्या भूताने केशवलाच का झपाटलं आहे? खरोखरच तुंबाड गावात मंजुळा सापडते का? तिचं म्हणणं काय ते समजून घेत भूताला पळवून करुणाकर गुरुजी यशस्वी होतात का? या सगळ्याच्या गमतीशीर उत्तरातून ‘तुंबाडच्या मंजुळे’चं रहस्य उलगडत जातं.
आपल्या मातीतली गोष्ट असेल तर ती प्रेक्षकांना भावते, हे कैकवेळा आपण कोणा ना कोणाकडून ऐकलेलं आहे. पण, ही आपल्या मातीतली, आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे नेमकं काय? हे फार कमी जणांच्या लक्षात येतं. लेखक-दिग्दर्शक जे. पी. थुमिनाड यांनी त्यांच्या ‘सु फ्रॉम सो’ या चित्रपटात आपल्या आजूबाजूला वास्तवात घडणार्या गोष्टींचा धागा पकडत ही आपल्या माणसांच्या मनातल्या भीतीची, भयाच्या अंधाराने झाकोळून जाऊन अज्ञानाने किंबहुना मूर्खासारखं वागणार्या माणसांची, याच भीतीचं शस्त्र बनवत अन्याय करणार्याला धडा शिकवू पाहणार्या हुशारीची, जिद्दीची सुरेख गोष्ट रंगवली आहे.
ही गोष्ट ‘तुंबाडची मंजुळा’ या नावाने मराठीत आणताना त्याला कोकणची पार्श्वभूमी देत तिथल्या माणसांच्या जगण्याच्या संदर्भाशी जोडून घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी केला आहे. तो बर्यापैकी जमून आला आहे, पण सुरुवातीच्या काही प्रसंगांची मांडणी ही मूळ दाक्षिणात्य चित्रपटासारखीच आहे, हे सहज लक्षात येतं. गावात लग्न-हळद हे प्रकार मोठे असले तरी सतत माणसं दारू पिऊन तर्राट झाल्यागत वावरताना दाखवणं, रात्री म्होरक्याला मध्ये बसवून दारू-चकणा बेत सांभाळून प्रसंग रचणं, एखादं धूमशान गाणं ही मांडणी बर्याचशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आढळते. त्यामुळे खरंतर हा प्रकार टाळून त्याऐवजी काहीतरी वेगळी मांडणी ‘तुंबाडची मंजुळा’मध्ये करता आली असती. मात्र, रिमेकचं गणित जमवताना हा जसाच्या तसा जोडलेला भाग खटकतो. तो वगळता बाकी सगळी कथाप्रक्रिया मांडताना विनोद आणि भयाचं उत्तम मिश्रण जमून आलं आहे. त्यासाठी पटकथा लेखक ऋषीकेश तुरई आणि संवाद लेखक योगेश शिरसाट यांनाही श्रेय द्यायला हवं.
उत्तम अभिनय आणि विनोदी अभिनयाची अचूक जाण असलेल्या कलाकारांच्या हातात गोष्ट सोपवली की दिग्दर्शकाचं अर्ध काम फत्ते होतं, याचं यशस्वी उदाहरण ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी फक्त विनोदी अभिनय जमून उपयोग नाही. रूढार्थाने यातली महत्त्वाची पात्रं ही विनोदी नाहीत आणि तरीही त्यांनी त्यांच्या भूमिकांचा सूर अचूक पकडला आहे. विशेषत: ओम भूतकर आणि सई ताम्हणकर या दोघांनीही त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा पूर्ण भिन्न अशा भूमिका सुरेख वठवल्या आहेत.
चित्रपटातली खरी गंमत या दोघांच्या गोष्टीशी जोडलेली आहे. रवी अण्णाच्या भूमिकेतला जितेंद्र जोशी यांचा परकाया प्रवेश अगदी सहजसुंदर आहे. आपली जागा कुठे कशी काढायची हे बरोबर ओळखून असलेल्या मकरंद अनासपुरे यांनी कमाल गंमत आणली आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या काही उत्तम संवादांना कात्री लागलेली दिसते, पण किमान भूमिकेत कमाल गंमत आणण्यातली त्यांची हातोटी इथेही प्रभावी ठरली आहे. त्यांच्या तोंडी एक संवाद आहे, ‘मंजुळे पदर नीट खोचून घे गं बाई…’. खरोखरच अगदी पदर खोचून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
दिग्दर्शक – विविध कोरगावकर
कलाकार – जितेंद्र जोशी, ओम भूतकर, उषा नाडकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे.
