छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाईं या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक ओळख निर्माण केली आहे. तर अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून राणादाच्या भूमिकेतून राज्यभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसतो आहे. या मालिकेत सध्या राणा आणि अंजली यांच्या लग्नानंतरची प्रेम कहाणी बहरताना बघायला मिळते आहे.

https://www.instagram.com/p/BR4hBtJDhHV/

छोट्या पडद्यावर भोळ्याभाबड्या राणादाच्या प्रेमात पडलेल्या अक्षयाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. अभिनेता सुयश टिळकसोबत तिने शेअर केलेल्या या फोटोला तिच्या मालिकेप्रमाणेच पसंती मिळताना दिसते आहे. सुयशसोबत पोस्ट केलेल्या फोटोला तिने Missing You …Love! असे कॅप्शन दिले आहे. या फोटोचा काय अर्थ लावावा, असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना नक्कीच पडला आहे. अक्षया देवधर आणि अभिनेता सुयश टिळक हे दोघे चांगले मित्र आहेत. यापूर्वी अक्षयाने अनेकदा दोघांचे फोटो शेअर केले आहेत. होळीच्या रंगात रंगताना देखील सुयश आणि अक्षया एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर सक्रिय असणारा प्रत्येक जण आज आयुष्यातील अनेक क्षण इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून शेअर करत असतो. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे मराठी कलाकारही आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BRktSLNDmAL/

अक्षयाच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेविषयी बोलायचे तर ‘अंजली बाई’, ‘राणादा’ची निरागस प्रेम कहाणी सध्या एका वेगळ्या वळणावर प्रवास करत आहे. मालिकेच्या कथानकाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. टीआरपीमध्येही ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेने अभिनेता हार्दिक जोशी (राणा) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (अंजली पाठक) यांच्या अभिनय कौशल्यालाही दाद मिळत आहे. त्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे.