‘तुझी माझी लवस्टोरी’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

उन्हाळा संपत आलाय आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते पावसाचे. पहिला पाऊस अनेकांना पहिल्या प्रेमाची, पहिल्या अविस्मर्णीय भेटीची आठवण करून देतो. मनाला आनंदही देतो आणि अस्वस्थही करतो.

उन्हाळा संपत आलाय आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते पावसाचे. पहिला पाऊस अनेकांना पहिल्या प्रेमाची, पहिल्या अविस्मर्णीय भेटीची आठवण करून देतो. मनाला आनंदही देतो आणि अस्वस्थही करतो. त्या आठवणीत भिजलेले क्षण टिपता टिपता मन कुठल्या कुठे हरवून जातं… पहिल्या पावसाची हीच रंगत अधिक देखणी करायला ‘सिल्व्हर ऑटम प्रॉडक्शन्स’ निर्मिती संस्थेचा ‘तुझी माझी लवस्टोरी’ हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. ‘खूप उशीर होण्यापूर्वी आपलं प्रेम व्यक्त करा’ हे सांगण्याचा सुरेख प्रयत्न यात केला गेलाय. ऐन पावसाच्या रोमॅंटिक वातावरणात २० जूनला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय.

इंद्रनील आणि अदिती यांची अनोखी ‘लवस्टोरी’ सिनेमात पहाता येणार आहे. योगायोगाने अदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्यादरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या इंद्रनीलच्या प्रयत्नांना अदिती काय आणि कसा प्रतिसाद देते, यावर ‘तुझी माझी लवस्टोरी’ ची कथा बेतली आहे. चित्रपटात इंद्रनीलची भूमिका गौरव घाटणेकरने साकारली असून अदितीच्या भूमिकेत श्रुती मराठेने त्याला साथ दिली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक ऋषिकेश मोरे यांनी लिहिली असून संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. ऋषिकेश मोरे यांचे लेखन आणि निर्मिती असलेल्या ‘पिकनिक’ सिनेमानंतर येत असलेला ‘तुझी माझी लवस्टोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. ‘तुझी माझी लवस्टोरी’ सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शनात देखील प्रवेश केला असून निर्माता- दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी कामगिरी बजावली आहे.

‘तुझी माझी लवस्टोरी’ चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेसं युथफुल संगीत तरुणाईला नक्कीच आवडेलं असं आहे. ‘प्रेम’ या चित्रपटाच्या विषयाला साजेशी गीतरचना अश्विनी शेंडे यांनी लिहिली असून, हिंदीतील ख्यातनाम संगीतकार बापी तुतूल यांनी सुमधूर संगीताची साथ दिली आहे. प्रेमाच्या विविध भावछ्टा रेखाटणाऱ्या गीतांचा यात समावेश आहे. ‘सुटलेत हात ही’, ‘मी बेह्का’, ‘पसरून जशी’, ‘तुझी माझी लवस्टोरी’ या गीतांसोबत एक थीम सॉंग अशी वैविध्यपूर्ण पाच गाणी यात आहेत. ऋषिकेश कामेरकर व नेहा राजपाल यांनी ती गायली आहेत. प्रेमकथेला साजेसे सिनेमाचे छायाचित्रण अर्जुन सार्टे यांनी केलं असून संकलन रोहन देशपांडे यांचे तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाम, मृणालिनी जांभळे, अशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमाने या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘तुझी माझी लवस्टोरी’ येत्या २० जूनला चित्रपटगृहात दाखल होतोय.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tuzi mazi love story in theater on 20th june

ताज्या बातम्या