काही वर्षांपूर्वी स्टार प्लसवर सुरू झालेली 'कसौटी जिंदगी की' ही मालिका बरीच गाजली होती. या मालिकेत अभिनेत्री श्वेता तिवारी मुख्य भूमिकेत दिसली होती. तर अभिनेता सिजेन खानचीही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता सिजेन खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ४४ वर्षीय सिजेन खान लवकरच त्याची गर्लफ्रेंड अफसीनसोबत लग्न करणार आहे. याच कारणाने सध्या त्याच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिजेन खाननं त्याच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. सिजेन आणि अफसीन एकमेकांना मागच्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. अफसीनबाबत बोलताना सिजेननं तिच्या कौशल्याबद्दल सांगितलं. अफसीन खूप छान बिरयानी बनवते. सिजेननं २०२० मध्ये पहिल्यांदा तिनं बनवलेली बिरयानी खाल्ली होती. त्यानंतर तिला प्रपोज केलं केलं होतं. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सिजेन म्हणाला, 'आम्ही तीन वर्षांपासून सोबत आहोत आणि खूप आनंदी आहोत. जर करोनाची समस्या आली नसती तर एवढ्यात आम्ही लग्नही केलं असतं. यावर्षी आम्ही लग्न करणार आहोत. मला असं वाटतं की, लग्नासाठी कोणतही योग्य वय नाही.' एवढी वर्षं लग्न न करण्याचं कारण विचारल्यावर सिजेन म्हणाला, 'मला लग्नासाठी अजिबात घाई करायची नव्हती. मला अशी व्यक्ती हवी होती जी साधी असेल, घरातील सर्वांची काळजी घेईल आणि प्रामाणिक असेल. मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जिचं वागणं चांगलं असेल. जी आमच्या नात्याचा आदर करेल. अशात मी अफसीनला भेटलो आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'