‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऋषी कपूर, इरफान खान यांचा खास भाग होणार पुन्हा प्रदर्शित

वाचा, कधी पाहता येणार हे विशेष भाग

अभिनेता इरफान खानच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून बॉलिवूड सावरत नाही, तोच ३० एप्रिल रोजी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. यो दोन दिग्गज कलाकारांची अशी अचानक एक्झिट झाल्यामुळे कलाविश्वासोबतच चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत. इरफान आणि ऋषी कपूर यांनी जरी जगाचा निरोप घेतला असता तरीदेखील ते चित्रपट, अभिनय यांच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहेत. विशेष म्हणजे या दोन कलाकारांना द कपिल शर्माच्या माध्यमातून अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे.

इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीदेखील ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय द कपिल शर्मा या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत. कपिल शर्माने या दिग्गजांना आदरांजली वाहण्यासाठी एक नवीन शक्कल लढविली आहे. या शोमध्ये ऋषी कपूर आणि इरफान खान यांचे जुने एपिसोड पुन्हा एकदा दाखविले जाणार आहेत. या शोमधील कीकू शारदा यानने ट्विट करुन ही माहिती दिली.


या आठवड्यात ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. त्यांचा जुना एपिसोड दाखविण्यात येणार असून त्यात त्यांची पत्नी नीतू कपूरदेखील दिसणार आहेत, असं ट्विट कीकूने केलं. त्यासोबतच त्याने आणखी एक ट्विट करत इरफान खानने सहभाग घेतलेला एपिसोडही दाखविण्यात येणार असल्याचं म्हटलं.

दरम्यान, हिंदी मीडियमच्या प्रमोशनसाठी इरफान खान कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळचा एपिसोड पुन्हा एकदा दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही विशेष भाग शनिवार आणि रविवार या दोन दिवशी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tv the kapil sharma show irrfan khan rishi kapoor episodes to re telecas ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या