Thalapathy Vijay Tamil Nadu CM victory and past family legal dispute : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. अभिनेता आता लवकरच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. अभिनेता ते मुख्यमंत्री असा त्याचा प्रवास आता त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. अलीकडेच ४ मे रोजी लागलेल्या विधानसभेच्या निकालात विजयच्या टीव्हीके या पक्षाने १०७ जागा जिंकत जवळपास बहुमत मिळवलं.
विजयने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, पण आता तो मुख्यमंत्री म्हणून तमिळनाडू या राज्याचा कारभार पाहणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. गेली दोन अडीच वर्षे अभिनेता राजकारणात सक्रिय असून पहिल्या निवडणूकीतच त्याने बाजी मारली, पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विजयला मुळात राजकारण आवडत होता का, त्याला यामध्ये यायचं होतं का असा प्रश्न निर्माण होतो कारण त्याने चक्क एकदा त्याला राजकारणात जाण्यासाठी आग्रह धरणाऱ्या त्याच्या आई-वडिलांविरोधातच तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जातं. हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं होतं?
काही रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये विजयने ११ जणांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांचाही समावेश होता. विजयने आपल्या नावाचा, फोटोचा किंवा फॅन क्लबचा वापर राजकीय कामांसाठी करू नये, अशी मागणी केली होती.
ही कारवाई त्याच्या वडिलांनी २०२० मध्ये विजयची परवानगी न घेता त्याच्या फॅन असोसिएशनचं ‘विजय मक्कल इयक्कम’ (VMI) या राजकीय संघटनेत रूपांतर केल्यानंतर करण्यात आली होती. त्यावेळी विजयने सार्वजनिकपणे सांगितलं होतं की, त्याचा त्या पक्षाशी थेट किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही.
तीन वर्षांनंतर अभिनेत्याने मोठा बदल करत फेब्रुवारी २०२४ मध्ये अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. विजयने (TVK) या पक्षाची स्थापना केली. नंतर सप्टेंबर २०२५ मध्ये या पक्षाची निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली.
टीव्हीकेने धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समानतेच्या विचारांवर भर दिला. हे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि के. कामराज यांच्या प्रेरणेतून घेतले असल्याचे पक्षाने सांगितलं. २०२६ची निवडणूक ही विजयची पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत त्याने दमदार कामगिरी करत २३४ सदस्यांच्या विधानसभेत १०८ जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आता लवकरच विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय कोणती कामं हाती घेतो, कोणत्या योजना आणतो तसंच त्याचं सामाजिक कार्य या सगळ्याकडेच त्याच्या चाहत्यांसह अनेकांचं लक्ष लागून आहे.
