scorecardresearch

शाहीद कपूरच्या कारकीर्दीची विशी!

हिंदी चित्रपटसृष्टीत वीस वर्षांची कारकीर्द पूर्ण करणाऱ्या शाहीद कपूरचा नुकत्याच झालेल्या ‘झी सिने पुरस्कार २०२३’ या सोहळय़ात गौरव करण्यात आला.

sahid kapoor
शाहीद कपूरच्या कारकीर्दीची विशी!

शाहीद कपूरचा बॉलीवूड प्रवेश झाल्यानंतर काही काळातच तो तरुणाईच्या गळय़ातील ताईत झाला होता. त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा आजपर्यंत अधिक लोकप्रिय राहिली आहे हे खरं असलं तरी सुरुवातीच्या काही चित्रपटांनंतर त्याने आपल्या भूमिकांची निवड बदलली. अधिक आव्हानात्मक चित्रपट आणि उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटातून काम करत स्वत:ला सिद्ध केलेला शाहीद कपूर आता वेगळय़ा अर्थाने पुन्हा विशीचा झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत वीस वर्षांची कारकीर्द पूर्ण करणाऱ्या शाहीद कपूरचा नुकत्याच झालेल्या ‘झी सिने पुरस्कार २०२३’ या सोहळय़ात गौरव करण्यात आला.

शाहीद कपूरसाठी ‘मारुती सुझुकी अरेना प्रेझेंट्स झी सिने पुरस्कार २०२३’  हा एक खास सोहळा ठरला. चित्रपटसृष्टीतील त्याच्या २० वर्षांच्या कारकीर्दीचा या वेळी गौरव करण्यात आला. सर्वाचा आवडता, लाघवी व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेत त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजवरची ही वाटचाल आपल्याला लाभलेले दिग्दर्शक आणि सहकारी यांच्यामुळेच शक्य झाली असल्याचे सांगत शाहीदने सगळय़ांचे आभार मानले. शाहीद आणि उत्तम नृत्य या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पुरस्कार सोहळय़ातील या खास क्षणाच्या निमित्ताने शाहीदने स्वत:च्याच चित्रपटातील गाण्यांवर दिलखेचक नृत्य सादर केले. ‘मौजाही मौजा’, ‘गंदी बात’, ‘शाम शानदार’ यांसारख्या त्याच्या आणखीही काही लोकप्रिय गाण्यांवर थिरकत त्याने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मनं जिंकली.

‘इश्क विश्क’ या शाहीदच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी मिळालेल्या पुरस्काराची व्हिडीओ क्लिप या वेळी दाखवण्यात आली. ‘‘तेव्हा मी अंधेरीत राहात होतो. मला खरं तर त्या वेळी बडय़ा, नामवंत डिझायनर्सची नावंही ठाऊक नव्हती. अशा प्रकारच्या पुरस्कार कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्याकडे चांगले कपडे नाहीत, असं मला वाटत होतं; पण आता जेव्हा मी या सगळय़ाचं अवलोकन करतो, तेव्हा मी काही तितका वाईट दिसत नव्हतो असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यातील हे काही सर्वोत्कृष्ट क्षण असतात आणि मागे वळून तुम्ही जेव्हा अशा काही क्षणांची आठवण करता तेव्हा तुम्ही कसे होता आणि तुम्ही आता कुठवर येऊन पोहोचला आहात याचा एक आरसा तुम्हाला दिसतो,’’ असं सांगत शाहीदने या वीस वर्षांच्या आपल्या वाटचालीबद्दल आनंद आणि समाधानाची भावना व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 01:05 IST