नसिरुद्दीन शाह यांनी एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांना निकृष्ट दर्जाचे अभिनेता म्हणत वाद ओढावून घेतला आहे. आपल्या वडिलांचा असा अपमान झाल्याने दिवंगत राजेश खन्ना यांची मुलगी आणि अभिनेत्री टविंकल खन्नाने नसिरुद्दीन यांच्यावर  निशाणा साधला.
नसिरुद्दीन शाह यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आजकाल चांगले चित्रपट बनत नसल्याचे सांगत त्यासाठी अभिनेता राजेश खन्ना यांना कारणीभूत ठरवले. नसिरुद्दीन म्हणाले की, बॉलीवूडमध्ये काहीच बदल झालेला नाही. ५० वर्षांपासून ते तसेच आहे. फोटोग्राफी आणि एडिटिंग सोडले तर सर्व ७०च्या दशकाप्रमाणेच आहे. त्या काळी ७० च्या दशकात कथा, अभिनय, संगीत आणि गाणी बिघडू लागली होती. त्यावेळी रंगीत चित्रपट बनू लागले होते. हिरोईनला जांभळ्या रंगाचा ड्रेस तर हिरोला लाल रंगाचा शर्ट घालून त्यांचे काश्मीरमध्ये शूटींग केले की चित्रपट झाला. कोणी कथेचा विचारचं करत नसे. तो ट्रेण्डचं झाला होता. मला वाटतं तेव्हा राजेश खन्ना यांनी काहीतरी करायला हवं होत. त्यावेळी ते चित्रपटांमध्ये देव मानले जात होते. याव्यितरीक्त शाह यांनी राजेश खन्नांच्या अभिनयावरही प्रश्न उभा केला. ते म्हणाले की, ७० च्या दशकातचं सामान्य दर्जाचे चित्रपट येण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी राजेश खन्नाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते यशस्वी कलाकार झाले, पण माझ्या नजरेत ते साचेबद्ध अभिनेता होते. मी तर म्हणतो ते एक निकृष्ट अभिनेता होते, असे नसिरुद्दीन यांनी मुलाखतीत म्हटलेयं.
ट्विंकलने ही मुलाखत वाचल्यावर ट्विटरद्वारे आपला राग व्यक्त केला. ती म्हणाली, सर, जर तुम्ही जिवंत व्यक्तीचा आदर करू शकत नाही तर निदान मेलेल्या व्यक्तीचा तरी आदर करूच शकता. तिच्या या ट्विटला दिग्दर्शक करण जोहर, मराठी अभिनेता जितेंद्र जोशी ही साथ दिली.