कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून चित्रपटातील इतर भूमिकांवरुन नुकताच पडदा उचलण्यात आला. सैफ अली खान, शरद केळकर, ल्यूक केनी, पद्मावती राव यांनी साकारलेल्या विविध भूमिकांचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अजयने तानाजींचा एक प्रोमो व्हिडीओ व पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला. हा पोस्टर पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ‘जय शिवाजी, जय तान्हाजी’ असा जयजयकार करण्यात आला.

‘तान्हाजी’च्या पोस्टरचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक करण्यात आलं. त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तानाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते.

‘तान्हाजी’ चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. १५० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका कोणती असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही.

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.