मराठी रंगभूमी आजही मराठी कलाकारांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचं माध्यम आहे. आजही नाटकांचे प्रयोग हमखास हाऊस फुल होतात आणि आजही प्रेक्षक मराठी नाटकांना तितकीच पसंती देताना दिसतात. पण इतकं असून अनेकदा रंगभूमीवरील कलाकार नाटकांच्या नाट्यगृहांच्या वाईट अवस्थेबद्दल तक्रार करताना दिसतात. नाट्यगृहांची परिस्थिती आजही अपेक्षित तितकी सुधारलेली नसल्याचं अनेक जण म्हणतात. आता ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांनीसुद्धा याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी रंगभूमीवरील वातावरणाबद्दलही सांगितलं आहे.

उदय टिकेकर यांनी यावेळी रंगभूमीवरील नाटकांना यश मिळालं नाही की त्याचा परिणाम कलाकारांवर विशेष करुन मुख्य भूमिकेत असलेल्या नायकावर कसा होतो याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी यावेळी त्यांनाही असा अनुभव आल्याचं सांगितलं आहे. म्हणूनच त्यांनी करिअरच्या मधल्या काळात हिंदी व इंग्रजी नाटकांमध्ये काम केलं आणि ठरवून काही काळ मराठी रंगभूमीपासून दूर राहिले यांबद्दल सांगितलं आहे.

नाटक चाललं नाही की नायकाला कमनशिबी मनालं जातं

अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. त्यांना तुम्ही ठरवून मराठी नाटक करणं बंद केलं का असं विचारल्यानंतर उदय टिकेकर याबद्दल म्हणाले, “ठरवून केलं म्हणजे एखादं नाटक चाललं नाही तर तुम्ही कमनशिबी मानले जाता”. पुढे त्यांना असं तुमच्याबाबतीत झालंय का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “हो असं मला वाटतं. एखादं नाटक जर चाललं नाही तर निर्माता जबाबदारी घेत नाही आणि मग माझंही मन खट्टू व्हायला लागलं”.

नाट्यगृहांमधील प्रसाधनगृहांची परिस्थिती फार वाईट – उदय टिकेकर

उदय टिकेकर याबद्दल पुढे म्हणाले, “आणि अजून एक कारण म्हणजे मी कुठेतरी वैतागलो होतो. सांगायला संकोच वाटतोय पण आपल्याकडे प्रसाधनगृहांची परिस्थिती खूप वाईट आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी या गोष्टी स्वच्छ अवस्थेत असतात.पण मी जेव्हा हिंदी, इंग्रजी नाटक करतो पृथ्वी थिएटरमध्ये, नेहरूमध्ये केलं अशा नाट्यगृहांमध्ये सादरीकरण केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वच्छतागृहात जातो तेव्हा खूप छान वाटतं. स्वच्छ जागा असते. आमच्या शिवाजी मंदिरला मेकअर रूममधून बाहेर पडलो की प्रसाधनगृहामधून वास येतो. त्यामुळे मला ते नाही जमलं”.

उदय टिकेकर पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी जायचो ना मला नाही पटायचं मला असं वाटायचं की आपण एवढं काम करतो इतक्या साध्या गोष्टी तर नीट असल्याच पाहिजे. एकदा सुमीत राघवनेही यामुळे प्रश्न उपस्थित केला होता. अजूनही तसंच आहे पण आता जरा बरं व्हायला लागलं आहे. त्यामुळे तेसुद्धा एक कारण होतं की मी मराठी नाटकांपासून दूर गेलो”.

पुढे नाटकाला यश मिळालं नाही तर नयकाला कमनशिबी ठरवलं जातं याबद्दल ते म्हणाले, “माझी इतर काम छान होती. पण नाटकाच्या नायकाला दोषी ठरवलं जातं. नाटक चाललं नाही की त्याचं खापर त्याच्यावर फोडलं जातं. चित्रपटांबाबतही तसंच आहे ना. आता रणवीर सिंह धुरंधरनंतर वर गेलो तो देवच बनला. पण त्याच्या आधीचे त्याचे दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यातला एक आमचाच होता सर्कस. त्यामुळे हे होत असतं”.