धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा खास शो १५ मे रोजी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. या शोकरिता शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पाहिल्यावर चित्रपटाचे मनापासून कौतुक केले. मात्र त्याचवेळी त्यांनी आपण चित्रपटाचा शेवट पाहिला नाही असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आता याच वक्तव्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री चित्रपटानंतर काय म्हणाले…
चित्रपटात धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांची भूमिकाही मुख्यमंत्र्यांना फारच आवडली. धर्मवीर आनंद दिघेंची व्यक्तीरेखेला प्रसादने योग्य न्याय दिल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रसादचं कौतुकही केलं. आनंद दिघे यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कसं संघर्षमय आयुष्य जगलं याची गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या साकारल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाच्या कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व टीमचे कौतुक करत अभिनंदन केले. “आयुष्य कसं जगावं? हे शिकवणारा एक माणूस आपल्यामध्ये होता, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. ‘प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असला पाहिजे’ हे चित्रपटातील वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आनंद दिघे नावाचा धाक शहरात असेल तर शहारातील महिला-भगिनींचं आपोआप रक्षण होईल,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचं नातं…
“चित्रपटाचा खरा भाग आम्ही पाहिला आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचं नातं आधिक घट्ट होतं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे धर्मनिष्ठा आणि जनतेवर निस्सीम प्रेम करणारे होते. गुरू शिष्याचं नातं कसं असावं, याचं उत्तम उदाहरण हे दोघं आहेत,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र त्याचवेळेस त्यांनी आपण चित्रपटाचा शेवट पाहिला नसल्याचं सांगितलं.

…म्हणून क्लायमेक्स पाहिला नाही
यामागील कारण सांगताना, मात्र या सिनेमाचा शेवट फार दुःखदायक असल्याने तो पाहणे आपण टाळलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा मला अतीव दुःख झाले होते. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब देखील अत्यंत भावुक झाले होते असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आता नेमक्या याच कारणामुळे उद्धव ठाकरेंनी चित्रपटाचा शेवटं पाहिला नाही की यामागे वेगळं काही कारण होतं असा प्रश्न नितेश राणेंनी ट्विटवरुन उपस्थित केलाय.

मात्र नितेश राणेंना वेगळीच शंका…
मुख्यमंत्र्यांसाठीच्या खास शोनंतर दोन दिवसांनी नितेश यांनी यासंदर्बात ट्विट केलंय. “उद्धव ठाकरेंनी धर्मवीर चित्रपट दुखद शेवट पाहता येणार नाही म्हणून टाळला? असं (मला) वाटत नाही,” असं ट्विट नितेश यांनी केलंय. तसेच पुढे बोलताना नितेश यांनी मुख्यमंत्र्यांनी चित्रपट का शेवट न पाहता सोडला याबद्दलही शक्यता व्यक्त केलीय. “त्यांनी चित्रपट शेवट न पाहताच सोडला कारण त्यांना राज साहेब (राज ठाकरे) आणि राणे साहेब (नारायण राणे) यांना ग्लोरिफाय करुन (चांगल्या प्रतिमेत) दाखवलेलं त्यांना पहावलं नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना नितेश राणेंनी, “यावरुनच ते शिवसेनेच्या उभारणीमध्ये कुठेच नव्हते हे सिद्ध होत आहे. खरं हे नेहमीच खुपणारं असतं,” असंही म्हटलंय.

नितेश राणेंच्या या ट्विटला अद्याप शिवसेनेकडून कोणीही उत्तर दिलेलं नाही. या चित्रपटाच्या शेवटी आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर त्यांना राज ठाकरे आणि नारायण राणे भेटायला आल्याचा सीन दाखवण्यात आलाय.