फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेत्री गौहर खान हिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने दिल्ली पोलिसांवर टीका करत उमर खालिदला पाठिंबा दिला आहे.

दिल्लीमधील दंगल ज्या लोकांमुळे घडली त्यांना अटक करण्याची मागणी गौहर खानने केली आहे. तसेच पोलिसांसमोर उभं राहून गोळ्या झाडणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर करत तिने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “या बंदुकधारी व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या पोलिसांना पाहा. असं वाटतंय गुंडगीरी करणारा हा व्यक्ती पोलिसांचा सीनियर आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलेली नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन गौहर खानने उमर खालिदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.