‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. आता सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागामध्ये सहभागी होणार आहे. उपेक्षित महिलांचा ‘आधारवड’ असलेल्या ‘माउली सेवा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

‘माउली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था गेली पंधरा वर्षे आजारी, बेघर, बेवारस अशा महिलांना कायम स्वरूपाचे उपचार आणि निवारा देण्यासाठी ‘मनगाव’ हा प्रकल्प चालवते. समाजानी, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून मुक्ता आणि उमेश हे दोघे या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर आले आहेत. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.