भारतीय संगीतविश्व हे किती समृद्ध आहे हे आपल्याला ठाऊक आहेच, शिवाय कलाविश्व आणि राजकारण यांच्यातील नातंसुद्धा आपल्याला ठाऊक आहेच. संगीतविश्वातील एक चतुरस्त्र गायिका म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या पद्मजा फेणाणी जोगळेकर या सध्या चर्चेत आहेत.
नुकतंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची त्यांच्या मुंबईच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. राजकीय विश्व आणि संगीतविश्व या दोन्हीवर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.




आणखी वाचा : मुंबईतील खड्डे कधी भरून निघणार? नितीन गडकरींचं समाधानकारक अन् चोख उत्तर
विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पद्मजा फेणाणी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. देशाला मोदींनी केवढ्या ऊंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि जगभरात आज आपल्या देशाची कशी दखल घेतली जात आहे याबद्दल सांगत पद्मजा फेणाणी यांनी पंतप्रधानांच्या कार्याची प्रशंसा केली.
इतकंच नव्हे तर यावेळी पद्मजा यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातील एक छानसं गीत गाऊन दाखवलं. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे बऱ्याच राजकीय नेत्यांशी चांगले सलोख्याचे संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. पद्मजा फेणाणी यांना त्यांच्या संगीत विश्वातील योगदानासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.