बॉलिवूडमध्ये ८०च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांवर छाप पाडणा-या अभिनेत्री रेखा यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे.  रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आपल्या सौंदर्याने सर्वांवर भुरळ पाडणा-या या अभिनेत्रीचे आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, रेखा यांना भांगात कुंकू लावण्याची सवय आहे. मात्र, त्यांच्या या सवयीमागचे रहस्य अद्याप काही उलगडलेले नाही. पहिल्यांदाच त्या कुंकू लावून आल्या तेव्हा तेथे उपस्थित सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांनी २२ जानेवारी १९८० रोजी विवाह केलेला. या विवाहसोहळ्याला रेखा यांनीही उपस्थिती लावली होती. आरके स्टुडिओत पार पडलेल्या या सोहळ्यात अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासह बॉलीवूडमधील सर्व नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. महत्त्वाचं म्हणजे, त्यावेळी रेखा यांच्या एंट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, शुभ्र पांढरी साडी, डोक्यावर लाल टिकली या वेशातील रेखांना पाहून उपस्थित असलेले सर्वचजण चकित झाले. तेव्हा पहिल्यांदाच सर्वांनी रेखा यांना अशा वेशात पाहिले होते. इतकेच नाही तर  रेखा त्या पार्टीत अमिताभ यांच्या बाजूला जाऊन बसल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या तेव्हा तिथे याबद्दल चर्चा तर झालीच शिवाय तिथे उपस्थित असलेल्या जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरचा रंगही उडालेला दिसला. रेखा यांच्या या एंट्रीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. या घटनेनंतर जवळपास एक महिन्याने त्यांनी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केल्याची बातमी समोर आली होती.
दरम्यान, रेखा यांना गजरा किती आवडतो हे सर्वश्रूत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या गजरा परिधान केल्याचे दृष्टीस पडले आहे. परंतु, गजऱ्याचा वापर त्या ‘एअर फ्रेशनर’ म्हणूनदेखील करतात हे आत्तापर्यंत कोणालाच ठाऊक नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या मॉर्डन लूकमधील रेखा यांनी डोक्याभोवती पांढऱ्या रंगाचा स्कार्फ गुंडाळल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या गाडीत बसल्यावर रेखा एका लाल रंगाच्या पिशवीतून गजरा बाहेर काढताना दिसल्या. गजऱ्याच्या सुगंधाचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी तो गजरा समोरच्या सीटवर टांगून ठेवल्याचे व्हिडिओत पाहावयास मिळते. अलिकडेच ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या रेखाच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यासिर उस्मान लिखित या पुस्तकात रेखांच्या आयुष्याबद्दल अनेक आश्चर्यकारक खुलासे करण्यात आले आहेत.