उर्फी जावेद नेहमी कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिचे वेगवेगळे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसंच अभिनेत्री अनेकदा त्यामार्फत तिची मतं, प्रतिक्रिया मांडत टीका करणाऱ्यांना स्पष्टपणे उत्तरही देत असते. आता पुन्हा ती चर्चेत आलीये. ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला तिने तिच्या शब्दात स्पष्टपणे उत्तर देत सुनावलं आहे.

उर्फी जावेदने माजी डीडी न्यूजच्या एका पत्रकारावर संताप व्यक्त करत सडेतोड उत्तर दिलं. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार संबंधित पत्रकाराने उर्फीने हिंदू धर्म स्वीकारला असून तिने तिचं नावही बदललं असल्याचा दावा केला होता. तसंच ती अर्धनग्न कपडे घालते अशा शब्दांतही तिच्यावर टीका केली होती. या दाव्यांवर उर्फीने संताप व्यक्त करत संबंधित पत्रकाराला सोशल मीडियावर सुनावलं. त्यानंतर उर्फीने आणखी एक दावा करत सांगितलं की, त्या व्यक्तीला जाब विचारल्यानंतर एका कंटेंट क्रिएटरने तिला आक्षेपार्ह मॅसेज पाठवले.

उर्फीवर झाली टीका

डीडी न्यूजच्या माजी पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या मीता चौधरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर उर्फी जावेदबाबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी उर्फीवर टीका करत म्हटलं की, “उर्फीला प्रसिद्धी मिळण्यामागचं एकमेव कारण म्हणजे ती अर्धनग्न कपडे घालते. त्याशिवाय तिच्या प्रसिद्धीचं दुसरं कोणतंही कारण नाही. ती नेहमीच अशा कपड्यांमध्ये दिसते.”

नाव आणि धर्म बदलल्याचा केला दावा

पुढे त्यांनी दावा करत म्हटलं, “मुस्लीम असलेल्या उर्फीने आता तिचं नाव बदलून रीता भारद्वाज केल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तिने धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. तसेच त्यांनी उर्फीला “थोडी लाज-लज्जाही बाळगा,” असा सल्लाही दिला. मात्र, या दाव्यांबाबत कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही आणि उर्फी जावेदने हे दावे फेटाळत संबंधित व्यक्तीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

उर्फीने फेटाळून लावले आरोप

मीता चौधरी यांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत उर्फी जावेदने त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता हटवण्यात आलेल्या त्या स्टोरीमध्ये उर्फीने लिहिलं, “कोणीही स्वतःला पत्रकार म्हणवून घेतात. काकू, कृपया आधी थोडा अभ्यास करा. मी ना माझं नाव बदललं आहे, ना धर्म. खरं तर मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही.” या पोस्टद्वारे उर्फीने धर्मांतर केल्याचा आणि नाव बदलल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला.

उर्फीने पोस्टमध्ये पुढे धारदार शब्दांत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी फक्त कपड्यांबाबतच नव्हे, तर बोलण्यातही मी तशीच आहे. पण आज त्याबद्दल बोलायचा मूड नाही. एकदा गुगल करून तरी पाहा, माझ्या नावावर किती शो आहेत. तुमचा मेकअप पाहून जितकी लाज वाटली, त्याहून जास्त तुमची पत्रकारिता पाहून वाटली. टीका करायची असेल तर बिनधास्त करा, पण खोट्या बातम्या पसरवू नका.” या पोस्टमधून उर्फीने नाव बदलल्याचा आणि धर्मांतर केल्याचा दावा पुन्हा एकदा स्पष्टपणे फेटाळून लावत खोटी माहिती पसरवू नये, असा इशाराही दिला. यानंतर उर्फी जावेदने तिला आलेल्या मॅसेजचे स्क्रीनशॉटही इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि स्पष्ट शब्दात सुनावलं.