Upasana Kineni Weight Loss: राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी-कोनिडेला या यशस्वी उद्योजक आहेत. तसेच, ७७ हजार कोटींच्या अपोलो या भारतातील एका सर्वांत मोठ्या हेल्थकेअर ब्रँडच्या त्या वारसदार आहेत. मात्र, यशस्वी उद्योजक होण्याआधी किंवा राम चरणशी लग्न करण्याआधी उपासना यांना त्यांच्या दिसण्याशी संबधित अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

राम चरणच्या पत्नीचे १८ व्या वर्षी ९५ किलो होते वजन

उपासना जेव्हा परदेशात शिक्षण घेत होत्या, त्यावेळी त्यांचे वजन वाढले होते. त्या १८ वर्षांच्या असताना त्यांचे वजन ९५ किलो होते. परदेशात असताना त्यांना घरच्यांची आठवण येत असे, त्या सगळ्याबरोबर जुळवून घेताना त्यांना मोठ्या प्रमाणात खाण्याची सवय लागली आणि मग अर्थातच त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. सगळ्या सोई-सुविधा असतानाही स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी उपासना यांना संघर्ष करावा लागला.

२०१७ मध्ये ‘फेमिना’ला दिलेल्या मुलाखतीत उपासना म्हणालेल्या, “मला लठ्ठपणाचा सामना करावा लागला. अमेरिकेत असताना मी खूप स्थूल होते. लंडनला गेल्यानंतर मी हाईड पार्कची पूर्ण फेरी मारायची आणि लंडन मॅरेथॉनही पूर्ण करायची, असं ठरवलं होतं. मात्र, गुडघ्यांवर ताण आला. माझी इच्छाशक्ती होती; पण मी ते योग्य पद्धतीनं करत नव्हते.”

उपासना व राम चरण (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

त्या म्हणालेल्या, “माझे वजन ९५ किलो होते. त्यामुळे मी सगळ्यात आधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर मी तांदूळ आणि गव्हाचे पदार्थ खाणे बंद केले आणि त्याऐवजी ओट्स खायला सुरुवात केली. त्याचा मला खूप फायदा झाला. त्यानंतर आहारात थोड्या प्रमाणात प्रोटीनचा समावेश केला. मी कॉलेजला जाण्यासाठी कारऐवजी चालत जात असे. दररोज १० हजार पावले चालले पाहिजे. तसेच भूक लागल्यानंतरच खाल्ले, तर तुम्ही आयुष्यभर तंदुरुस्त राहू शकता, यावर माझा विश्वास आहे.”

पुढे उपासना म्हणालेल्या, “तुमच्या शरीरासाठी काय योग्य आहे हे तुमच्यापेक्षा चांगले कोणीही सांगू शकत नाही. मी प्रत्येक प्रकारचे डाएट केले आहे. सेलिब्रिटी डाएटिशियनचा सल्ला घेतला आहे; पण शेवटी माझ्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे, हे माझं शरीरच सर्वांत चांगल्या पद्धतीनं सांगू शकतं. मीही कधी कधी माझ्या डाएटमध्ये चीट करते; पण त्याचा समतोल कसा साधायचा हे मला माहीत आहे. व्यायामामध्येही मी योगापासून वेट्स आणि रनिंगपर्यंत सर्व काही करून पाहिलं. मात्र, माझ्या लक्षात आलं की, वजन वाढण्यामागे मी काय खाते हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवून, दररोज १० हजार पावलं चालण्याचा मला फायदा झाला.”

उपासना (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

जेव्हा उपासना यांनी २०१२ मध्ये राम चरणबरोबर लग्न केले. त्यानंतरही तिच्या दिसण्यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्या म्हणालेल्या की, सुरुवातीला मला वाईट वाटायचं; पण त्यानंतर मी खंबीर झाले.

उपासना यांनी असेही सांगितले की, त्यांना इन्सोम्निया (Insomnia)चा त्रास आहे. त्या म्हणालेल्या की, मी आणि माझी आई चार तासांपेक्षा जास्त झोपू शकत नाही. त्यामुळे मला थकवा जाणवतो. म्हणूनच मी माझ्या जीवनशैलीत बदल केले आहेत. तसेच, स्लीप क्लिनिकही सुरू केली आहेत. उपासना असेही म्हणालेल्या की, स्वतःच्या इच्छाशक्तीतूनच दीर्घकाळ टिकणारे बदल होतात.

उपासना (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

राम चरण व उपासना अध्यात्माकडेही वळले आहेत. तसेच, ते अनेकदा एकत्र वर्कआऊट करतात. २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आणि त्यांना तीन मुले आहेत.