मुंबई : प्रभू श्रीरामासाठी लक्ष्मण फक्त भाऊ नव्हे, तर विश्वासाचा, कर्तव्याचा आणि आयुष्यभराच्या साथीचा जणू आधार. दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका वठविण्यात हातखंडा असलेले अभिनेते उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. आपल्या सहज, वास्तववादी आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी एका भावनिक नात्याची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहेत.
अभिनेता रजत बेदी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. या चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.
‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ यांसारख्या यशस्वी, मनोरंजक आणि आशयघन चित्रपटांबरोबरच भावनिक प्रसंगांची उत्कृष्ट मांडणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’ चित्रपटाच्या लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट पडद्यावर दोन भावांचं नातं उलगडताना कुठेतरी आपल्या घरातल्या, आपल्या भावाची आठवण करून देणारी ठरणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा या सगळ्यांचा वेध या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
