१० वर्षांनंतर उर्मिला मातोंडकर करणार ‘बेवफाई’

उर्मिला एक स्टार आहे. ती आयटम गर्ल नाही

urmila-matondkar
उर्मिला मातोंडकर

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकरकडे पाहिले जायचे. २०१६ मध्ये मोशिन अख्तरशी लग्न केल्यानंतर उर्मिला बॉलिवूडपासून थोडी दूरच गेली. २००८ मध्ये एमी या सिनेमात तिने शेवटचे काम केले. या सिनेमात तिच्यासोबत संजय दत्तही होती. ४४ वर्षिय उर्मिला आता पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळली आहे. सुमारे १० वर्षांच्या कालावधीनंतर उर्मिला ब्लॅकमेल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या ब्लॅकमेल सिनेमात ती बेवफा ब्यूटी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

उद्या २३ मार्चला हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे. पावनी पांडेने हे गाणे गायले आहे. पावनीने याआधी लैला में लैला गाणे गाऊन प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ब्लॅकमेल सिनेमात कोणतेही गाणे नाही. पण सिनेमाची कथा सांगणारं एखादं गाणं आवश्यक असल्याचे निर्मात्यांना वाटले. त्यामुळे सिनेमात हे खास गाणे चित्रीत करण्यात आले. अमिताभ भट्टाचार्याने हे गाणे लिहिले असून उर्मिलाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहून तिचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही.

सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव देवने सांगितले की, ‘उर्मिला एक स्टार आहे. ती आयटम गर्ल नाही. आम्हाला एक अशी अभिनेत्री हवी होती जिचं स्वतःचं असं वेगळं स्थान असेल. मी योग्य व्यक्तीची निवड केली याची मला खात्री आहे. उर्मिला या गाण्यासाठी अगदी योग्य निवड आहे.’ ६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. अडीच मिनिटाच्या या ट्रेलरच्या सुरुवातीलाच इरफान त्याची कहाणी एका मित्राला सांगत असतो. एकेदिवशी ऑफीसमधून तो आपल्या घरी पत्नीला सरप्राईज देण्यासाठी घरी लवकर पोहोचतो. पण त्याच्या पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याने ती त्याला दगा देते. या घटनेला सामोरं गेलेला इरफान पत्नीला किंवा तिच्या प्रियकराला काही बोलण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्यांना ब्लॅकमेल करून पैसे मागू लागतो. खरंतर पैशाची रक्कमदेखील फक्त १ लाख रुपये इतकीच दाखवली आहे. पण मध्यमवर्गीय असल्याने या एक लाख रुपयांसाठी त्यांची धडपड सुरु असते आणि हीच सिनेमाची कथा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Urmila matondkar blackmail song bewafa beauty

ताज्या बातम्या